भोपाळ, 30 जून : लाखो रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption case) करून पोलिसांना अनेक दिवस गुंगारा देत फिरणाऱ्या विशा माधवानीला (Visha Madhvani) पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. सध्या विशाची सगळीकडं जोरदार चर्चा सुरु असून तलाव निर्माणाच्या कामात तिनं 42 लाख रुपये (42 lakh) गटकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यात काही अधिकारी आणि कर्मचारीदेखील तिच्यासोबत होते. तिच्यासह एकूण 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदवले असून त्यांना शोधण्यासाठी पथकंदेखील रवाना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. इथल्या नेपानगरमधील बोरबन तलाव योजनेत 42 लाख 11 हजार रुपये बेकायदेशीर मार्गाने लाटल्याचा आरोप विशा माधवानीवर ठेवण्यात आला आहे. या योजनेतील बोगस लाभार्थींच्या नावाची यादी तयार करून त्यांच्या नावावर सरकारी खात्यातील रक्कम जमा करण्यात आली. उपजिल्हा दंडाधिकारी या पदाचा गैरफायदा घेत काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तिनं हा प्रकार केला. जेव्हा ही चोरी उघडकीला आली तेव्हा तिच्यासह सर्व अधिकारी परागंदा झाले. विशा माधवानी ही सध्या झाबुआ जिल्ह्यात उपजिल्हा दंडाधिकारी या पदावर तैनात असून कार्यालयात हजर राहत नसल्याचं दिसून आलं आहे.
चौथ्या प्रयत्नात झाली उप जिल्हाधिकारी
विशा माधवानी चौथ्या प्रयत्नात उपजिल्हाधिकारी होण्यात यशस्वी झाली. 2015 साली घेण्यात आलेल्या मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तिनं तिसरा क्रमांक पटकावला होता. यापूर्वी 2012 साली जिल्हा संयोजक तर 2013 साली महिला सक्षमीकरण अधिकारी या पदांवरही विशानं काम केलं आहे.
हे वाचा - कम्प्युटर पदवी धारकांना का आली काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ? वाचा
कुटुंबाला धक्का
विशाचा हा कारनामा ऐकून कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. अर्थात विशावर होणारे आरोप चुकीचे असून ती लवकरच आपलं निर्दोषत्व सिद्ध करेल, असा विश्वास त्यांना वाटतो. विशाला एक धाकटा भाऊ आणि बहिण आहे. त्यांच्याशिवाय आई, वडिल आणि आजी अशा मोठ्या परिवारात ती राहते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Police