आता वाहन नियम मोडल्यास दहापट अधिक दंड

आता वाहन नियम मोडल्यास दहापट अधिक दंड

मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे.

  • Share this:

 

02 एप्रिल :  मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. सुधारित कायद्यानुसार मद्यप्राशन करुन गाडी चालवणं महागात पडू शकतं. मद्यपी वाहनचालकांकडून 5 पट जास्त दंड वसूल केला जाणार असून यानुसार दंडाची रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

भारतातील रस्त्यांवर दरवर्षी सुमारे 5 लाख अपघात घडतात. तर दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागतात. या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिला होता. या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. आता लवकरच हे सुधारित विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत सादर केलं जाईल.

या नवीन विधेयाकांतर्गत आता हिट अँड रन केस मध्ये मिळणारा अपघात मोबदला 25 हजारांवरून 2 लाख रुपये करण्यात आला आहे. मात्र, याबाबत एखाद्या प्रकरणात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 10 लाख रुपयांची रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

वाहनांचे परवाने काढणं, त्यांची मुदत वाढवणं, वाहनांची नोंदणी यांसारखी महत्वाची कामं आता ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.

अल्पवयीन मुलांनी जर मोटार वाहन कायदे मोडले तर त्यांच्या पालकांना याबाबत दोषी ठरवण्यात येणार आहे. तसंच 3 वर्षे तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे परवाना रद्द करण्यात येणार आहे.

आकारल्या जाणाऱ्या दंडांतसुद्धा बदल करण्यात आले असून आता कमीतकमी 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसंच पोलिसांना गाडीची आणि चालकाची कागदपत्रं जप्त करण्याचे अधिकार दिले आहेत.

मद्यप्राशन करुन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून 5 पट जास्त दंड आकारला जाईल. याशिवाय मद्यधूंद वाहनचालकामुळे एखादाचा बळी गेल्यास त्याच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. यात दोषी आढळल्यास त्या वाहनचालकाला  10 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

यासाठी गृहमंत्रालयाला भारतीय दंड विधानातील कलम २९९ मध्ये सुधारणा करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

नव्या कायद्यातील महत्त्वाच्या तरतूदी

- 177 A हा नवा नियम लागू करण्यात आला. रस्ता नियम उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

- विनापरवाना वाहन वापरल्यास किंवा विनापरवाना वाहन चालवल्यास 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल

- दारू पिऊन वाहन चालवल्यास 10 हजार रुपये दंड

- मर्यादेबाहेर मालवाहतूक केल्यास 20 हजार रूपये दंड

- मर्यादेबाहेर प्रवासी घेतल्यास प्रतिप्रवासी 1 हजार रूपये दंड

- सीटबेल्ट न लावल्यास 1 हजार रूपयाचा दंड

- हेल्मेट न घातल्यास 1 हजार रुपये असा दंड आकारला जाईल तर 3 महिन्यांपर्यंत परवाना स्थगित केला जाईल.

- जास्त गतीनं वाहन चालवल्यास 1000 ते 2000 रुपये दंड

- धोकादायक वाहन चालवल्यास 5 हजार रुपयापेक्षा अधिक दंड

- रेसिंग आणि गती चाचण्या केल्यास 5000 रुपये दंड

- हिट अँड रन प्रकरणी जखमी झालेल्या व्यक्तींना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे

- हिट अँड रन प्रकरणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 10 लाख रुपयांची रक्कम देण्याची तरतूद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 01:45 PM IST

ताज्या बातम्या