नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : देशाची राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक आत्महत्येच्या घटनेनं हादरली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे मृतदेह कुजलेल्या परिस्थितीत आढळून आले. शंभु कुमार, सुनीता देवी, शिवम, सचिन आणि कोमल अशी या मृतांची नाव आहे.
भजनपुरा परिसरात मृतदेह कुजल्यामुळे दुर्गेंधी पसरली होती, त्यानंतर हा भयावह प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी आणि 3 मुलांचे हे मृतदेह आहे. पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृतांमध्ये मुलांचं वय हे अनुक्रमे 18,16 आणि 12 वर्षांच्या जवळपास आहे.
मृतांची नातेवाईक सोनी जयस्वाल यांनी News18 शी बोलताना सांगितलं की, जयस्वाल कुटुंब हे या परिसरात B ब्लॉकमध्ये राहत होतं. जवळपास 8 महिन्यापूर्वीच शंभू जयस्वाल यांनी एक ई-रिक्षा खरेदी केली होती. त्यांचा 18 वर्षांचा मुलगा शिवम हा बारावीला होता. तर दुसरा मुलगा सचिन (वय 15) आणि मुलगी मुस्कान (वय 13) आणि पत्नी सुनीता देवी असा परिवार होता. हे सर्वजण बिहार येथील सोपोर जिल्ह्यात राहणारे होते.
तर नवी दिल्लीचे सहपोलीस आयुक्तांनी सांगितलं की, 'पत्नीचा मृतदेह हा वेगळ्या रूममध्ये होता आणि तिन्ही मुलांचा मृतदेह हा वेगळ्या खोलीत होता. मृतदेह हे कुजलेले होते, त्यामुळे त्यांचा खूप दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. घराबाहेरही कुलुप लावण्यात आले होते. घरात चोरी झाली असावा असा कोणताही प्रकार समोर आला नाही.'
जयस्वाल कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच हे घर भाड्याने घेतले होते. अचानक घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांना संशय बळावला आणि त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा प्रकार समोर आला आहे.
याआधीही बुराडी आत्महत्याकांडामुळे दिल्ली हादरली होती. 2018 मध्ये नॉर्थ दिल्लीतील बुराडीच्या संत नगर परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळून आले होते. यात 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. सगळ्यात गंभीर म्हणजे या सर्व मृतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. पोलीस तपासात एक डायरी सापडली. त्यात 2017पासूनच्या नोंदी होत्या. हे कुटुंब खूप धार्मिक होतं. ही हत्या आहे की आत्महत्या अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अंधश्रद्धेतूनच हा अघोरी प्रकार घडल्याचं समोर आलं होतं.