कर्नाटकात बसपाच्या मंत्र्यांचा राजीनामा, महाआघाडीला आणखी एक धक्का

कर्नाटकात बसपाच्या मंत्र्यांचा राजीनामा, महाआघाडीला आणखी एक धक्का

अर्थसंकल्प आणि अनेक मुद्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या यांनी कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे कुमारस्वामी सरकार आणखी अस्थिर होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

संदिप राजगोळकर, बंगळूरू, ता. 11 ऑक्टोबर : कर्नाटकचे बहुजन समाज पक्षाचे मंत्री एन. महेश यांनी गुरूवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या अध्यक्षा मायवती यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर महेश यांच्या राजीनाम्याकडे पाहिलं जातं. कर्नाटकात बसपा आणि काँग्रेस हे कुमारस्वमींच्या सरकारमध्ये सहभागी आहेत.

कुमारस्वामी यांच्या आघाडीच्या सरकारला हा धक्का मानला जातो. एन. महेश हे कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण मंत्री आहेत. काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुका या बसपा स्वबळावर लढवेल अशी घोषणाही त्यांनी केली. त्यामुळं कर्नाटकमध्येही महाआघाडीचा प्रयोग फसण्याचीच शक्यता आहे.

मे महिन्यात कुमारस्वामी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला मायावती यांच्यासह विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यानंतर भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येणार असं बोललं जाऊ लागलं. मात्र काही महिन्यांमध्येच ही एकी विरून गेली. काँग्रेस अहंकारी आहे प्रादेशिक पक्षांना किंमत देत नाही असा आरोप करत मायावती यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुमारस्वामी यांचा जेडीएस आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केली होती. त्यामुळे बसपाच्या आमदाराला मंत्रिपदही देण्यात आलं होतं. काँग्रेस आणि जेडीएसमध्येही धुसफूस सुरू आहे. त्यातच आता बसपाच्या मंत्र्यांने राजीनामा दिल्याने काँग्रसला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्प आणि अनेक मुद्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या यांनी कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे कुमारस्वामी सरकार आणखी अस्थिर होण्याची शक्यता आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 09:02 PM IST

ताज्या बातम्या