धक्कादायक! हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यानं मोडलं लग्न; वधूपित्यानं त्याच दिवशी घरात घेतला गळफास

धक्कादायक! हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यानं मोडलं लग्न; वधूपित्यानं त्याच दिवशी घरात घेतला गळफास

हुंड्याची मागणी पूर्ण करता आली नाही, म्हणून नवरदेवाची वरातच दारी आली नाही. मुलीच्या वडिलांची त्याच दारातून अंत्ययात्रा काढायची वेळ आली.

  • Share this:

फतेहपूर, 18 डिसेंबर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pendemic) आणि देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) यामुळं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांना व्यावसायात जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. याचे अनेक विपरीत परिणाम आता हळूहळू जाणवत आहेत. यात शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या  लोकांसाठी तर लॉकडाऊन हा 'शाप'च ठरला आहे. ते आपल्या मुलीचं लग्न करायलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, हुंड्याची रक्कम नवऱ्या मुलाला देता आली नाही, म्हणून मुलीचं लग्न मोडलं. याचा धसका बसलेल्या वधूच्या पित्यानं राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar pradesh) फतेहपूर (fatehpur) जिल्ह्यातील बिंदकी गावातील आहे. गुरुवारी सायंकाळी आपल्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम हुंड्या अभावी पार पडला नाही, म्हणून वडिलांनी फाशी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. वडिलांच्या निधनानंतर घरात शोककळा पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून मुलाच्या घरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पुरवा गावात राहणाऱ्या 45 वर्षीय राम सुफल निषाद यांची मुलगी माला देवी यांच लग्न हमीरपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीबरोबर ठरलं होतं. 6 डिसेंबर रोजी लग्नाची तारीख पक्की करण्यात आली होती. पण हुंड्याची मागणी पूर्ण न करू शकल्यानं वराती मंडळी मुलीच्या घरी आलीचं नाहीत. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत रीतसर लेखी तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरूवात केली होती, पण मध्येच या प्रकरणानं नवं वळण घेतलं.

मुलगी अचानक बेपत्ता झाली

ज्या मुलीचं लग्न होणारं होतं ती मुलगी अचानक घरातून संशयास्पदपणे गायब झाली. रात्री उशिरापर्यंत राम सुफल यांची मुलगी परत घरी आली नाही, म्हणून वडिलांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात मृत पित्याची मोठी मुलगी प्रीती देवी यांनी आरोप केला की, हमीरपूर येथील रामगोपाल यांच्या मुलाशी लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा वरात घेऊन नवरीमुलीच्या घरी आला नाही, त्यामुळं नवरीचे वडील गेल्या काही दिवसांपासून दुःखी राहत होते. तसेच काल सायंकाळी नवरी मुलगी माला देवी घरातून अचानक गायब झाली आणि रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्यामुळं वधुच्या पित्यानं आत्महत्या केली आहे.

आरोपींवर कडक कारवाई केली जाईल- एसपी

या प्रकरणात एसपी सतपाल अंतिल यांनी सांगितलं की, बिंदकी गावातील राम सुफल नावाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. मृत व्यक्तीला सात मुली आणि तीन मुलं आहेत. यापैकी मालादेवीचं लग्न हमीरपुरातील एका युवकाशी ठरलं होतं, हुंड्याची रक्कम न दिल्यानं भर लग्नाच्या दिवशी वरात आली नाही. यामुळं दुः खी पित्यानं आत्महत्या केली आहे. एसपींनी सांगितलं की घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading