बंगळुरु, 8 जानेवारी: लग्न (Marriage) ठरलं. लग्नाचे सर्व विधी सुरु झाले. आता लग्नाच्या सप्तपदी बाकी होत्या त्याचवेळी नवरा मुलगा त्याच्या प्रेयसीसोबत पळून गेला. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे ऐन लग्न मंडपात जिच्यावर ही वेळ आली त्या नवरी मुलीनं या संकटातून मार्ग काढला.
‘बेंगलुरु मिरर’नं दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकातील (Karnataka) चिकमंगळुर (Chikmagalur) जिल्ह्यातील नवीन आणि अशोक या दोन भावाचं एकाच दिवशी आणि एकाच मंडपात लग्न निश्चित झालं होतं. अशोकचं ठरल्याप्रमाणे लग्न झालं. नवीननं लग्नाचे सुरुवातीचे विधी केले मात्र ऐन सप्तपदीच्या वेळी तो मंडपातून पळून गेला. नवीननं लग्न केलं तर भर मंडपात येऊन विष प्राशन करेन अशी धमकी त्याच्या प्रेयसीनं दिली होती. या धमकीला घाबरुन तो मंडपातूनच पळून गेला.
गोष्ट इथंच संपत नाही!
एखाद्या सिनेमात घडावा तसा हा प्रकार होता. नवीन अचानक पळून गेल्यानं विवाह मंडपात गोंधळ उडाला होता. मात्र ही गोष्ट इथंच संपत नाही. नवीनची होणारी पत्नी सिंधूनं मंडपात आलेल्या वरातींपैकीच एकाशी लग्न करण्याचं ठरवलं. तिने मंडपामध्येच वरसंशोधन केलं. सिंधूचा हा शोध या घटनेचा साक्षीदार असलेल्या चंद्रप्पापाशी संपला.
चंद्रप्पा हा बस कंडक्टर आहे. दोन्ही परिवाच्या संमतीनं चंद्रप्पा आणि सिंधूचं लग्न झालं आणि ‘एका लग्नाच्या गोष्टी’मध्ये आलेलं धोकादायक वळण सुखरुप पार पडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka