नवी दिल्ली, 7 फेब्रवारी : विवाह हा जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आणि सुखद क्षण असतो. अलीकडे विवाहसोहळ्यातला मजेशीर प्रसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याकडे कल वाढला आहे. विवाहापूर्वी मतदान करणं, वरातीतल्या गमतीजमती आदी प्रसंगांचा यात समावेश असतो. सध्या एका विवाहसोहळ्यानंतर एक प्रसंग लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
विवाहसोहळा होताच वधूला माहेरच्या मंडळींनी निरोप दिला. त्यानंतर ती वरासोबत गाडी बसून निघाली; पण त्यांची गाडी एका कॉलेजसमोर थांबली. त्यानंतर वर गाडीतून उतरला आणि थेट वर्गात परीक्षा देण्यासाठी गेला. वराची परीक्षा होईपर्यंत गाडीत वधू त्याची वाट पाहत बसली. परीक्षेचा पेपर दिल्यानंतर हे दाम्पत्य घरी पोहोचलं. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून, नवऱ्या मुलाचं विशेष कौतुक होत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हरिद्वार या तीर्थक्षेत्रावर एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. तिथं विवाहसोहळा होताच नवरा मुलगा एलएलबीचा पेपर देण्यासाठी थेट कॉलेजमध्ये पोहोचला. नवरा मुलगा परीक्षा देत असताना दुसरीकडे त्याची वधू गाडीत त्याची वाट पाहत बसली होती. परीक्षा संपल्यानंतर नवऱ्याला पाहताच या वधूच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं. कारण तिच्या नवऱ्याने नव्या जीवनाला सुरुवात करताच भविष्याविषयीचा विचार म्हणून एलएलबीचा पेपर देण्यास प्राधान्य दिलं होतं.
हरिद्वारच्या श्यामपूर कांगडी गाजीवाला इथले रहिवासी तुलसी प्रसाद याचा विवाह हरियाणातल्या हिसार इथे पार पडला; मात्र विवाहाच्या दिवशी एलएलबीचा पेपर असल्याने वर घरी न जाता थेट परीक्षा केंद्रावर पोहोचला. विशेष म्हणजे तो विवाहानिमित्त परिधान केलेल्या कपड्यांमध्येच परीक्षा केंद्रावर पोहोचला. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. अर्थात त्याला या वेशभूषेत परीक्षा देण्याची परवानगी प्राचार्यांनी दिली होती.
याबाबत पूर्णानंद तिवारी लॉ कॉलेजचे प्राचार्य अशोक कुमार तिवारी यांनी सांगितलं, `तुलसी प्रसादने लग्नाच्या वेशभूषेत परीक्षा दिली. त्याचा एलएलबीचा पाचव्या सेमिस्टरचा पेपर होता. त्याने हा पेपर दिला नसता तर त्याचं एक वर्ष वाया गेलं असतं. त्यामुळे त्याने विवाहाच्या वेषभूषेत पेपर देण्याविषयी परवानगी मागितली होती. विवाहानंतर तुलसीप्रसाद घरी न जाता थेट कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी पोहोचला. नव्या जीवनाची सुरुवात करताना त्याने परीक्षेला प्राधान्य दिलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. तो परीक्षा देत असताना त्याची वधू कॉलेजजवळ गाडीत बसून त्याची पाहत होती.`
हेही वाचा - Instagram वर मैत्री, मग लिव्ह-इन-रिलेशनशिप, आता महिलेने केला धक्कादायक आरोप
तुलसी प्रसादने सांगितलं, `हिसारला माझा विवाहसोहळा पार पडला. परंतु, दुसऱ्या दिवशी माझा एलएलबीचा पेपर होता. त्यामुळे मी घरी गेलो असतो तर पेपरला उशीर झाला असता. त्यामुळे विवाहस्थळावरून थेट कॉलेजमध्ये येण्याचा निर्णय घेतला. विवाहानंतरचे विधी आता घरी गेल्यावर पूर्ण होतील. विवाहाच्या वेशभूषेत परीक्षा देणं मला काहीसं विचित्र वाटलं; पण पेपर देणं गरजेचं होतं. विवाहबंधनात अडकताच मी नवीन जीवनाला सुरुवात केली; मात्र भविष्याची चिंता नाकारता येत नाही. त्यामुळे मी एलएलबीचा पेपर देण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचलो.`
तुलसी प्रसादच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तुलसी प्रसादने नव्या जीवनाला सुरुवात करताना उज्ज्वल भविष्यासाठी परीक्षेला प्राधान्य दिलं ही कौतुकास्पद गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Bridegroom, Haryana