संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्त्व करावं, शिवसेना खासदाराचं साकडं

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्त्व करावं, शिवसेना खासदाराचं साकडं

  • Share this:

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: मराठा आरक्षणला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यावरून मराठा बांधव नाराज झाले असून ते पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्त्व भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावं, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.

दिल्ली येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांची सदिच्छा भेट घेऊन खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. तसेच खासदार शेवाळे यांनी संभाजीराजे यांना लेखी निवेदनही दिलं आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा...मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी संभाजीराजेंना सांगितला नवा फार्म्युला

महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या लढ्यात सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजावणाऱ्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपला नेहमीच पाठिंबा असल्याचां सांगितलं आहे. या लढ्याचे नेतृत्त्व राजेंनी करावे, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.

याप्रकरणी राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्रानेही लक्ष देऊन, माननीय पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी जवळपास 5 ते 6 फार्म्युले सुचवल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असा आग्रही खासदार संभाजीराजे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्ष भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास राज्य सरकारच जबाबदार ठरवलं जात आहे. त्यात मराठा संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत खासदार संभाजीराजेंनी शरद पवारांकडे एक आग्रह केला. शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

तामिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का?

दरम्यान, तामिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा सवाल खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणविषयीची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे. यासाठी आपण सर्वांना संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा..आमदार बच्चू कडू यांनी कंगना रणौतची उडवली जोरदार खिल्ली, म्हणाले....

खासदारांना लिहिलं पत्र...

खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एक पत्र लिहिले आहे. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33 टक्क्याच्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असंही खासदार संभाजीराजेंनी पत्रात म्हटलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 16, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading