नवी दिल्ली, 27 जानेवारी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवणावर ताव मारला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे देखील होते. शहा आणि मनोज तिवारींचा जेवण करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपाचा पॉलिटिकल स्टंट म्हणत नेटिझन्स या फोटोला चांगलच व्हायरल करत आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्तानं केलेलं Tweet सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
सयानीनं आपल्या ट्विटमध्ये ‘आर्टिकल15’ चित्रपटाचा डायलॉग आठवल्याचं सांगितलं. ‘महंत खाना भी घर से लाए रहे...और बर्तन भी’ असा डायलॉग सयानीनं या फोटोसाठी वापरला. ‘असं वाटतं की, यांनी आमचा चित्रपट पाहिला असावा’, असंही म्हणायला सयानी विसरली नाही. सयानीनं अमित शहा आणि मनोज तिवारींच्या जेवण करतानाच्या फोटोवर चांगल्याच कोपरखळ्या मारल्या आहेत.
नेते जेवण करत असलेले ताट आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरणारी ग्लास, जेवण ठेवण्यात आलेली भांडी हे सर्व नवीन आहेत. त्यामुळे हा फोटो आणखी व्हायरल होत आहे. भाजप कार्यकर्त्याच्या घरी रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अखेरच्या क्षणाला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी डाळ, चपाती, भाजी असं जेवण होतं. अमित शहा आणि मनोज तिवारींच्या व्यतिरिक्त आणखी दोन नेतेही कार्यकर्त्याच्या घरी उपस्थित होते. सध्या अमित शहा आणि मनोज तिवारींचा जेवणाचा हा कार्यक्रम नेटिझन्समध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे अभिनेत्री सयानी गुप्तालाही फोटोवर कॉमेंट करण्यापासून मोह आवरता आला नसल्याचं यावेळी दिसलं.