जयपूर, 24 जून : माणसाने खूप क्रूरपणे हिंसा किंवा अत्याचार केले, तर त्याचं वर्णन 'पाशवी' म्हणजे 'पशूंप्रमाणे' अशा शब्दात केलं जातं. प्रत्यक्षात मात्र पशूही जितकी हिंसा करणार नाहीत, इतकी हिंसा माणूस अनेकदा करत असतो. सध्याच्या जीवनात माणसाच्या या वाढत्या हिंसेची उदाहरणं अनेकदा पाहायला मिळतात. अलिकडेच राजस्थानमध्ये माणसाच्या क्रूरतेचं (Cruelty) दर्शन घडवणारं एक प्रकरण घडलं. कुत्र्यावरील अत्याचाराचा (Dog beating) व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ अभिनेता जॉन अब्राहमपर्यंत (John Abraham) पोहोचला आणि तो व्हिडिओ पाहून तो अत्यंत व्यथित झाला.
राजस्थानच्या (Rajasthan) अलवर (Alwar) जिल्ह्यातल्या रैणी (Raini) या गावात सहा दिवसांपूर्वी काही जणांनी एका कुत्र्याला (Dog) बांधून त्याचे तीन पाय अत्यंत क्रूरपणे कुऱ्हाडीने तोडून टाकले. त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला रात्रभर झोप लागली नाही, असं जॉन अब्राहमने सांगितलं. त्यानंतर त्याने अलवरच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांच्याशी या संदर्भात फोनवरून चर्चाही केली. एवढंच नव्हे, तर जॉनने लोकांना प्राण्यांवर प्रेम करण्याचं आवाहनही केलं.
हे वाचा - सलमान खानवर टीका करणं अभिनेत्याला पडलं भारी; कोर्टाचा जोरदार झटका
'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार जॉन म्हणाला, "अलवरमधल्या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यावर मला रात्रभर झोप लागली नाही. पोलीस अधिकारी तेजस्विनी गौतम (Tejswini Gautam) यांच्याशी फोनवरून बोलल्यावर मला असं कळलं, की आरोपींना लगेचच अटक झाली आहे. पोलिसांना त्याबद्दल धन्यवाद. पोलीस त्यांचं काम करत असतात. आपण त्यांना पाठिंबा देणं, साह्य करणं गरजेचं असतं. माझं सगळ्यांना आवाहन आहे, की अशा काही घटना आजूबाजूला दिसल्या तर तातडीने त्याची तक्रार नोंदवा. प्राणीही माणसांसारखेच आहेत. त्यांचीही काळजी घ्यायला हवी. त्यांच्यावरही प्रेम करायला हवं. ते तुमच्याकडून यापेक्षा जास्त काहीही मागत नाहीत"
काय होती घटना?
रैणी गावातले कालूराम मीणा यांनी एक कुत्रा पाळला होता. सहा दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास शेजारच्या काही व्यक्ती आल्या आणि त्यांनी त्या कुत्र्याला उचलून नेलं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेळीच्या कोकराला या कुत्र्याने पळवलं होतं, असा त्यांचा गैरसमज झाला होता. वास्तविक त्यांच्या कोकराला गल्लीतल्या दुसऱ्या एका कुत्र्याने पळवलं होतं. त्या व्यक्तींनी निर्दयपणे कुत्र्याचे तीन पाय तोडून टाकले. त्याला दोन तास तडफडवत ठेवलं. कुत्र्याच्या मालकाला कळल्यावर तो तिथे आला, तर त्या व्यक्तींनी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात प्रचंड रक्तस्राव झाल्याने कुत्र्याने प्राण सोडले.
हे वाचा - ‘अभिनेत्यानं लग्नाचं आमिष दाखवून फसवलं’; मिनिषा लांबाचा गौप्यस्फोट
तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. पशूक्रूरता अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमानवी घटनेबद्दल सर्वत्र खेद व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, John abraham, Pet animal, Viral, Viral videos