रांची, 28 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Coronavirus) साथीमुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन (Lockdown) संपल्यानंतर काही राज्यांमध्ये सुरक्षिततेचे नियम पाळून शाळांमधील निवडक इयत्तांचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. झारखंडमध्ये मात्र शाळा सुरू करण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. तर या काळात इथल्या निवासी शाळांची अवस्था अधिक बिकट झाली असून, त्यांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
इथल्या अनेक प्रसिद्ध आणि मोठ्या शाळांमध्ये गायी आणि घोडे पाळण्यात आले आहेत. निवासी शाळेतील मुलांना दुध मिळावे आणि घोडस्वारीचे धडे देण्यासाठी या गायी आणि घोड्यांचे पालन केले जाते. सध्या या प्राण्यांच्या पालनपोषणाच्या खर्चामुळे शाळांच्या निधीवर ताण पडत आहे. त्यावर एक अभिनव उपाय या शाळांनी शोधला आहे. या शाळा चक्क आपल्या गोठ्यातील गायींचे दूध रांची आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना विकत आहेत. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
झारखंडमधील विकास विद्यालय (Vikas Vidyalaya) ही खूप जुनी आणि नामांकित निवासी शाळा आहे. 175 एकरांवर पसरलेल्या या निवासी शाळेत (Boarding School) 300 विद्यार्थी राहतात. शाळेकडे 120 गायी आहेत. त्यापैकी सात गायी लॉकडाउनच्या काळात चांगला चारा न मिळाल्याने मृत्यू पावल्या. या गायींपासून शाळेला साधारण 350 लीटर दूध रोज मिळते.
(हे वाचा-Amazon वर लागणार 7 दिवसांचा बॅन? ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी)
शाळेचे प्राचार्य पी. एस. कालरा म्हणाले की, या गायींना सांभाळण्याचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आम्ही दूध विक्री करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शाळा लवकरच सुरू होईल या विचाराने त्यांनी गायीच्या दुधापासून आयुर्वेदिक तूप बनवण्यास सुरुवात केली. 45-50 लीटर दुधापासून एक किलो तूप तयार व्हायचे. त्यावेळी 1700 रुपये किलो दराने ते तूप विकण्यात आले. पण जुलैमध्ये देखील शाळा सुरू झाल्या नाहीत, तेव्हा शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी शाळेला दूधविक्री करण्याचा सल्ला दिला. त्यांनी ते दूध विकत घेण्याची तयारी दर्शवली. शाळेच्या व्यवस्थापनाने हा सल्ला मान्य करत, दूध विक्री सुरू केली.
रांची शहरातील 70 कुटुंबांना हे दुध पुरवण्यात येत असून, कोरोनाची साथ संपल्यानंतरही ही दुध विक्री सुरू ठेवण्याचा शाळेचा मानस आहे. कारण अतिरिक्त दूध विक्रीतून या जनावरांच्या पालनपोषणाचा खर्चही अंशतः भागत आहे. लॉकडाउनच्या काळात गायींना चांगला चारा मिळण्यात अडचणी आल्या. चाऱ्याच्या किंमतीही खूप वाढल्या होत्या.
तोरीयन स्कूलही (Taurian World School) देखील अशाच परिस्थतीतून जात आहे. त्यांच्याकडे 65 गायी आणि 16 घोडे आहेत. ही शाळाही स्थानिक भागात दूध विक्री करत आहे.
(हे वाचा-वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी! RCमध्ये नॉमिनी नाव दाखल करावं लागण्याची शक्यता)
दरम्यान, शाळा बंद असताना विद्यार्थ्यांकडून फक्त ट्युशन फी घेण्याच्या आदेशाविरुद्ध एक हजार 426 खासगी शाळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. झारखंड आणि बिहारमध्ये अनेक खासगी शाळा चालवणाऱ्या विद्या विकास समितीलाही निधीची कमतरता जाणवत असून, शाळा व्यवस्थापनाने मिठाई दुकानांना दूध विक्री सुरू केली आहे. झारखंड मधील खासगी शाळा आणि विद्यार्थी कल्याण संघटनेने याच आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून कोरोना संदर्भातील नियमांमध्ये सवलत देऊन वरच्या इयत्तांचे वर्ग भरवण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. या वर्गांच्या बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. अनेक राज्यांनी वर्गातील विद्यार्थी क्षमता कमी ठेवून आणि योग्य नियम पाळून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.