नागा शांतता करार आणि मुईवाहच्या विखारी नेतृत्वाची खेळी

नागा शांतता करार आणि मुईवाहच्या विखारी नेतृत्वाची खेळी

बंदुकीची ताकद आणि माओवादी समाजवादाच्या क्रूर, राक्षसी विचारसरणीचा मुईवाहवर सुरूवातीपासूनच प्रचंड पगडा आहे. नागालँडच्या शांतता प्रक्रियेत यामुळे कसा खोडा घातला गेला वाचा..

  • Share this:

अमिता आपटे

आपण रोजच्या जीवनात बोलताना 'इतिहासाची पुनरावृत्ती' ही उक्ती ऐकत असतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण सध्या नागालँडच्या नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड  (NSCN IM) या दहशतवादी संघटनेचा सध्याचा सरचिटणीस थांगलांग मुइवाह आपल्या आडमुठ्या आणि हेकेखोर वागणुकीतून दाखवून देत आहे. 1966 साली जो इंडो-नागा शांतता करार होऊ घातला होता त्यावेळीही त्यानी अशाच प्रकारे तिरकस भूमिका घेत शांतता करार प्रक्रियेत बरेच अडथळे निर्माण करुन ती विफल केली.

1955 साली सरचिटणीस टी. सखरी यांच्या नेतृत्वात नागा राष्ट्रीय परिषदेच्या (नागा नॅशनल काौन्सिल ) शांतताप्रेमी नेत्यांनी तत्कालीन अध्यक्ष फिजो यांच्यापासून फारकत घेतली. सर्व धर्मांच्या बाबतीत अतिशय सहिष्णू असणाऱ्या भारतात राहणे अंतर्गत, तसेच बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे, आणि विकासात्मक, शांततामय जीवनाचा अवलंब करण्यासाठी भारतात सामील होणे हाच सर्वोत्तम उपाय आहे हि बाब त्यांना पटली होती, हेच या निर्णयातून दिसून येते. यासानागा शांतता करार आणि मुईवाहच्या विखारी नेतृत्वाची खेळीठी त्यांनी एनएनसी-रिफॉर्मेशनची स्थापना केली. परंतु याचा परिणाम म्हणून अलगाववादी नेत्यांनी शांततामय मार्गाने आपल्या मागण्या मांडायचे सोडून तत्कालीन उग्रवादी लोकांना एकत्र करून शस्त्राच्या बळावर स्वतंत्र नागलीम निर्माण  करण्यासाठी भारताविरुद्ध सशस्त मोहिम उभी केली.

थोड्याच काळात टी. सखरी यांची फिजोच्या माणसांनी निर्घृण हत्या केली. तरीही नागा समाजाच्या सर्वोत्तम संभाव्य भविष्यासाठी वचनबद्ध असणाऱ्या एन.एन.सी.-आर. च्या इतर नेत्यांनी, हिम्मत न हरता प्रसंग स्वतःचे जीव धोक्यात घालून नागा राजकीय प्रश्नावर शांततेने तोडगा काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुमारे पाच वर्षांच्या शांततामय संघर्षानंतर त्यांनी तत्कालीन नागा हिल्स आणि तुएनसांग फ्रंटियर डिव्हिजन विखुरलेल्या नागा म्हणवल्या  जाण्याऱ्या काही समाजाला (१४ जनजाती) एकत्रित केले. आणि अखेरीस १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँडला, भारतीय संघाचे तेरावे राज्य नागालँड म्हणून विशेष सवलतीं सह (कलम ३७१ अ) मान्यता मिळाली.  नागा लोकांना महत्वाच्या वाटणाऱ्या सर्व बाबींवर निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांना देण्यात आला. आता त्यांच्यासमोर भूमिगत बंडखोरांची मने वळवून त्यांना भारतीय संघराज्यात नागरिक म्हणून सामील करून घेणे हे पुढचे मोठे आव्हान होते.

पुढे लगेच १९६४च्या सुरुवातीलाच, चर्चच्या पुढाकाराने, गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या अध्यक्षतेखाली, तत्कालीन मुख्यमंत्री बिमल कुमल चालिहा आणि ब्रिटीश पाद्री रेव्ह. मायकेल स्कॉट यांचा समावेश असलेल्या पीस मिशनची स्थापना युद्धबंदीचा करार करण्यासाठी करण्यात आली. (आता हाच मायकेल स्कॉट आतंकवादी बंडखोरांना शस्त्रे पुरवत होता आणि स्वतंत्र नागलीम च्या मान्यतेसाठी आंतराष्ट्रीय दबाव आणण्या साठी विविध देशाच्या राजदूतां बरोबर संधान साधत होता  हि बाबही कालांतराने उघड झाली व त्याला भारत सोडण्या साठी इंदिरा सरकार ने नोटीस देऊन हाकलून देण्यात आले होते , तो भाग वेगळा.) अतिशय मेहनतीने 'पीस मिशनने' भारत सरकार आणि भूमिगत संघटनांमध्ये समन्वय घडवून आणला आणि १ सप्टेंबर १९६४ मध्ये पहिली युद्धबंदी घोषित करण्यात आली. शांततापूर्ण  चर्चासत्रांना सुरुवात  झाली. तत्कालीन परराष्ट्र सचिव गुंडेवीया आणि नंतर धर्मवीर हे भारतसरकारचे कॅबिनेट सचिव  यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली. एनएनसीचे नेते स्कॅटोस्वू आणि भूमिगत सरकारचे अध्यक्ष आणि पंतप्रधान खुगाटो दुसऱ्या बाजूने चर्चेला बसत असत.

1966 च्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जास्तीत जास्त राजकीय लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी स्वतः चर्चेची जबाबदारी स्वीकारली. 1966 च्या पहिल्या तिमाहीत, दोन्ही बाजूंनी अनेक मतभेद मिटवण्यात यश येताना दिसत होते. इंदिरा गांधींहि नागा लोकांना आणि त्यांच्या आकांक्षांना सन्मान  मिळेल अशाप्रकारचे यासाठी महत्वाचे निर्णय घेतील असे स्पष्ट होऊ लागले होते. नागा समाजातर्फे वाटाघाटी करणाऱ्यानीहि मुत्सद्दी राज्यकर्त्यांप्रमाणेच भारतीय संघराज्याच्या सहमती देताना भारत सरकारकडून जास्तीत जास्त संभाव्य सवलती मागितल्या.अंतिम तोडगा अगदी निकट होता. आशेचा किरण दिसू लागला होता. नागा भव्य उत्सवाची तयारी करत होते.

याच काळात नागांच्या राजकीय मोर्चावर मणिपूर येथील तंगखुल या नव्याने पदवीधर झालेल्या मुइवाहचा उदय होत होता. १९६५साली मुईवाह ना  एनएनसीमध्ये दाखल करण्यात आले आणि लवकरच लंडनमधिल फिजोचे सरचिटणीस म्हणून ते काम पाहू लागले. फिजोनी आपल्या आयुष्याचा उर्वरित कालखंड लंडनमध्ये व्यतीत केला. नागालँडपासून दूर असल्याने आणि स्थानिक उपकर्मांविषयी त्यांना माहिती मिळावी, नागांना एकजूट ठेवणे  त्यांच्या राजकीय दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी त्यांना मुईवाह अतिशय योग्य उमेदवार वाटू लागला. मुइवाहा वर ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते.

फिझोच्या आशीर्वादाने मुइवाहने मात्र नगालॅंडच्या नागा जनजातीतील भेदभावांचा पुरेपूर दुरुपयोग करून घेण्यास सुरुवात केली. सेमा जनजातीचे नेते व नागालँडच्या फेडरल गव्हर्नमेंटचे अध्यक्ष स्काटोस्वू यांच्याविरूद्ध नागा आर्मीचा प्रमुख माऊन अंगामी यांना चिथावणी देण्यास सुरुवात केली.  सेमा जनजातीचे नेते, भारत सरकारशी जो समझोता करत आहेत त्यात आगामी समाजालाच मोठे नुकसान सोसावे लागेल, असा आरोप त्यांनी केला. जरी नागा राष्ट्रीय चळवळीत अंगामी राजकीय आघाडीवर होते, सेमा नेत्यांनीच १९६६पासून हि मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे अंगामींचा मुईवाहच्या बोलण्यावर पटकन विश्वास बसला.

रक्तलांछित राजकारण

शांतता कराराचा भंग करण्यासाठी मुइवाहने अशा प्रकारे सेमा-अंगामी समाजांना विभाजित करून एकमेकांसमोर उभे केले. एनएनसीचे सरचिटणीस या पदाचा वापर करून, नागाशांतता करारात वाटाघाटी करणार्‍यांना 20 एप्रिल 1966 रोजी, संपूर्ण स्वातंत्र्यापेक्षा कमी काहीही स्वीकारलेत तर परिणाम अतिशय भयंकर होतील असे धमकीचे पत्र प्रसारित केले. नागा जनजातींचा भयानक रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. स्कॅटोसवू  आणि इतरांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. कोहिमा शहरात कॅटो या मंत्र्याची (डिफेन्स किलोन्सरची) दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.

नागाप्रश्नाचा तोडगा निघण्याची सुवर्ण संधी पाण्यात गेली होती. नागा नेते तसेच त्यांचे हितचिंतकही निराश झाले. नागासमाजाचे एक उत्कट हितचिंतक जे.एच. हट्टन इतके हताश झाले की त्यांनी आसाम ट्रिब्यून या दैनिकाच्या संपादकांना एक लांबलचक पत्र लिहिले. १ जुलै ६६ रोजी प्रसारित झालेल्या या पत्रात हट्टन लिहितात, “मला असे वाटते की नागालँड राज्य स्थापनेमुळे, भारतीय राज्यघटनेतील कलमाप्रमाणेच नागासमाजला संपूर्ण संरक्षण मिळाले आहे. अपेक्षा  किंवा इच्छाही केली नसेल असे अधिकार त्यांना मिळालेले आहेत. अनेक निर्णय घेण्याबाबत संपूर्ण स्वायत्तता, भारत सरकारकडून वित्तपुरवठा अश्या कितीतरी चांगल्या गोष्टी त्यांनी पदरात पडून घेतल्या आहेत. हे युद्ध त्यांनी खरंच जिंकले आहेत, परंतु या विजयाचा संपूर्ण लाभ नागालँड राज्याला आणि इथल्या जनतेला व्हावा यासाठी बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि टेकड्यांमधील कायदे व सुव्यवस्था पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे. हट्टन यांनी बरीच वर्षे नागा हिल जिल्ह्याचे ब्रिटिश सरकारचे उपायुक्त म्हणून काम पाहिले होते.

अश्या प्रकारे, १९६६ मध्ये, थांगलॉंग मुइवाह यांनी भूमिगत सरकारच्या अध्यक्ष, पंतप्रधानच नाही तर संपूर्ण नागा समाजाचा विश्वासघात केला, नंतर १ १९८०मध्ये त्यांनी आपला गॉडफादर आणि मार्गदर्शक फिजो यांच्यासह इतर नेत्यांचा विश्वासघात केला.

अंगामि-सेमाना एकमेकांविरुध्द उभे करवून वरिष्ठ सेमा नेतृत्व संपवल्यानंतर मुइवाहने नागा सैन्याचा ताबा घेण्याकडे आपला मोर्चा वळवला. या नागा अलगाववादी सैनिकांचे चीनमधील छावण्यांमध्ये ट्रेनिंग होत असे. असेच एकदा १० जानेवारी १९७६ रोजी त्यांनी चीनमधून परतताना एका काचीन छावणीत मेजर जनरल नामलु कोन्याकला संपवले. मेजर जनरल नामलु कोन्याक हा फिजोचा निष्ठावंत आणि नागा आर्मी प्रतिनिधींचा प्रमुख होता. १९७५ मध्ये चीनमध्ये प्रशिक्षणवर्गव्यवस्था आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी म्हणून तो गेला होता. मुविवाहने आपल्या निष्ठावान तांगखुल सैनिकाकरवी तंबूत झोपलेल्या नामलुची हत्या घडवून आणली. त्यांनी नागा सैन्यात मोठ्या संख्येने तांगखुल तरुणांची भरती केली आणि तांगखुलांच्या बाजूने नागा आर्मीतील सत्ता संतुलन झुकवले.

हिंसाचाराचा इतिहास

बंदुकीची ताकद आणि माओवादी समाजवादाच्या क्रूर, राक्षसी विचारसरणीचा मुईवाहवर सुरूवातीपासूनच प्रचंड पगडा आहे. १९७९ च्या उत्तरार्धात त्यांनी एनएनसीमध्ये सत्ता काबीज केली आणि १९८०च्या सुरुवातीलाच त्यांनी  नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडची स्थापना केली. यानंतर भयंकर अशी यादवी सुरू झाली. अखंड हिंसाचार त्यानी चालू केला. फिजो केवळ अंगामींसाठी राजकीय सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप करून  त्यानी फिजोलाही देशद्रोही ठरवले.

मुईवाहची चीनच्या विस्तारवादी धोरणाप्रमाणे इशान्य भारत आणि म्यानमार मधील समस्त नागांना म्हणवल्या जाण्याऱ्या प्रदेशाला आपल्या अंमलाखाली एकत्र आणण्याची महत्वाकांक्षा आहे. परंतु मणिपूरचा नागा भूभाग नागालँडबरोबर एकत्रित न केल्यामुळे ती इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे त्यांना दिसत नाहीत.

डोवल यांची चाणक्यनीती

नागालँड गाव बुढा फेडरेशन , नागालँड ट्रायबल कौन्सिल आणि सर्व १४ जनजातींच्या शिखर संस्था यांनी मुईवाला नाकारून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सर्व नागांचा सर्वोच्च नेता होण्याची स्वप्ने शेवटी धुळीला मिळणार हे लक्षात आल्याने आता यावेळीही चर्चेनंतर जेव्हा सर्व नागा चिरस्थायी, सन्माननीय शांतता-कराराची अपेक्षा करीत आहेत, तेव्हा निघत असणारा तोडगा हेकेखोरपणे नाकारून मुईवाह पूर्वी खेळलेल्या चालीच परत खेळत आहे. स्वत: केलेल्या चुका परत परत करत आहे.

पंतप्रधानाची कणखर भूमिका आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या चाणक्य नीतीला यश येतंय असे आशादायी चित्र आहे. नागालँड मधील सर्व सामान्य नागा समाज याचे स्वागत कधी दबक्या आवाजात आणि तर कधी उघडपणे तसेच सोशाल मीडिया वर आता प्रकटपणे करू लागलाय.

(अमिता आपटे या ईशान्य भारताच्या अभ्यासक तसंच मानवी अधिकार कार्यकर्त्या आहेत. लेखिकेचे विचार स्वतंत्र आणि वैयक्कित आहेत. News18 या विचारांशी सहमत असेलच असं नाही)

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 18, 2020, 11:08 PM IST
Tags: nagaland

ताज्या बातम्या