हितेंद्र बारोट, गांधीनगर 18 मार्च : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यांतर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते उमेदवारांकडे. सत्ताधारी भाजपने अजुन लोकसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र गुजरातमधल्या गांधीनगरमधून यावेळी कोण लढणार याची उत्सुकता वाढली आहे.
गुजरातमध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी भाजपने पक्ष निरिक्षक पाठवले होते. गांधीनगरच्या कार्यकर्त्यांनी या जागेसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुक लढवावी अशी मागणी केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे सध्या गांधीनगरचे खासदार आहेत. अडवाणी यांच वय सध्या 91 वर्षांचं आहे. ज्येष्ठांना तिकीट न देण्याचा निर्णय भाजपने घेतल्यास अडवाणींना पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य प्रदेशच्या राज्यपाल आणि जेष्ठ नेत्या आनंदीबेन पटेल या सध्या गुजरातच्या दौऱ्यावर असून त्याही या जागेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आनंदीबेन या त्यांची मुलगी अनार पेटल यांच्यासाठीही ही जागा मागण्याची शक्यता आहे. आनंदीबेन यांनी दावा केल्यास अमित शहा अडवाणींची मुलगी प्रतिभा अडवाणी यांच्यासाठी तिकिट मागू शकतात असंही बोललं जात आहे. आनंदीबेन पटेल यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे.
गांधीनगरमधून अडवाणी हे सलग निवडून आले आहेत. त्यामुळे या जागेवरून राष्ट्रीय नेत्यालाच तिकीट द्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याचबरोबर 75 वर्षांपुढच्या नेत्यांना तिकीट देऊ नये असं संघाचही मत असल्याने अडवाणी यांच्याप्रमाणेच मुरली मनोहर जोशी यांनाही निवडणुकीपासून दूर राहावं लागणार आहे.