पाकव्याप्त काश्मीरमध्ये भाजप निवडणुका लढणार, तयार केला खास प्लॅन!

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भाजप निवडणुका लढणार, तयार केला खास प्लॅन!

भाजपने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) निवडणुका लढण्याची तयारी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मे: लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवल्यानंतर आता पक्षाने जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले. अशाच प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये देखील भाजपचे पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे भाजपने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पाक व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) निवडणुका लढण्याची तयारी केली आहे. यासाठी भाजप एक विशेष निवडणूक मोहिम सुरु करणार आहे.

भाजप केंद्रीय निवडणूक आयोगला PoKमधील 24 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती करणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 111 जागा आहेत. यापैकी 87 जागांवर आयोगाकडून निवडणुका घेतल्या जातात. पाक आणि चीनच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील विधानसभेच्या 24 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. असे मानले जाते की हा प्रदेश जेव्हा भारताच्या ताब्यात येईल तेव्हा त्या 24 जागांवर निवडणुका घेतल्या जातील.

2014मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिपल्स डेमोक्रेटिक पक्षाला 28, भाजपला 25, नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय अन्य छोटे पक्ष व अपक्षांनी 7 जागांवर विजय मिळवला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे पीडपी आणि भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले होते. पण 2018मध्ये भाजपने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे डिसेंबरपासून राज्यात राज्यपाल राजवट आहे.

अशा आहेत जागा

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या 87 जागांवर निवडणुका होतात. त्यापैकी 46 जागा काश्मीर विभागात तर 37 जागा जम्मू आणि 4 जागा लडाख विभागात येतात. याशिवाय दोन सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते.

PoKमधील परिस्थिती

राज्यात विधानसभेच्या 111 जागा असल्यात तरी त्यापैकी 24 जागांवर भारतीय निवडणूक आयोग निवडणूक घेत नाही. या 24 मतदारसंघाच्या परिसरावर चीन आणि पाकिस्तान ताबा आहे.

असा आहे भाजपचा प्लॅन

भाजप पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या 24 विधानसभेपैकी 8 जागांवर निवडणूक घेण्याचा आग्रह निवडणूक आयोगाला करणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 6 पैकी ३ जागांवर विजय मिळवला आहे. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्राल विधानसभा मतदारसंघात भाजपला सर्वाधिक मते मिळवली असून हा मतदारसंघ अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येतो. पाक सीमेच्या जवळ असलेल्या अनेक भागात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यामुळे येथे केवळ 1.14 टक्के मतदान झाले होते. एकूण 1 हजार 019 मतांपैकी भाजपला सर्वाधिक 323 तर NCला 234 मते मिळाली होती.

भाजपला अधिक मते मिळाल्यामुळे पक्षाचा विश्वास वाढला आहे. यावेळीच्या निकालामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचे निकाल देखील भाजपच्या बाजूने होते. आता लोकसभेत देखील चांगले निकाल लागले आहेत. त्यामुळेच आगामी विधानसभेत भाजपचे बहुमत असलेले सरकार स्थापन होईल, असा विश्वास पक्षाच्या एका नेत्याने 'द इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. सर्व काही ठीक झाले तर पाक अधिकृत काश्मीरमध्ये काही जागांवर निवडणूक होतील, असे देखील ते म्हणाले.

अशा होतील निवडणुका

पाक व्याप्त काश्मीरमधील एक तृतियांश लोक नियंत्रण रेषा पार करुन आले आहेत. POKमधील मतदार भारतात येत असतील तर त्यांना मतदानाचा हक्क दिला पाहिजे, असे भाजपचे मत आहे. यासाठी भाजपने 'एम फॉर्म' हा पर्याय सुचवला आहे. 'एम फॉर्म' नुसार भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांना ते राहत असलेल्या विधानसभा मतदारसंघात मतदान करण्याचा हक्क मिळतो. यासाठी त्यांना 'एम फॉर्म'मध्ये विधानसभा मतदारसंघाची माहिती द्यावी लागते आणि ते मतदानात सहभागी होऊ शकतात.

असा आहे पीओकेमधील निवडणुकीचा इतिहास

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी काश्मीरमध्ये राजा हरिसिंह यांचे राज्य होते. फाळणीच्या वेळी झालेल्या वादात काश्मीरचा निर्णय झाला नाही. जम्मू-काश्मीर विधानसभेची निर्मिती झाली तेव्हा पाक आणि चीनच्या ताब्यात भारतातील 24 मतदारसंघ होते. तेव्हापासून आयोगाने या 24 जागा राखीव ठेवल्या आहेत.

POKमधील नागरिकांना हवा आहे लोकप्रतिनिधी

जम्मू्-काश्मीरमध्ये 370 आणि 35 A कलम लागू करण्यात आल्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या. पण यात पीओकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे कोणतेही प्रतिनिधी सहभागी झाले नाहीत. त्यानंतर पीओकेमधील नागरिक हिंसाचारापासून वाचण्यासाठी खोऱ्यात राहण्यास आले. हे नागरिक त्यांच्या हक्कासाठी लोकप्रतिनिधीची निवड करावी अशी मागणी करत आहेत. त्यासाठीच भाजप प्लॅन करत आहे.

VIDEO: भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर धनंजय महाडिकांनी दिलं उत्तर

First published: May 29, 2019, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading