News18 Lokmat

बूट फेकून मारणाऱ्या खासदाराचं तिकीट कापलं

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे शिवसेनेने खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं होतं. आता भाजपनेही बूट फेकून मारणाऱ्या एका खासदाराला उमेदवारी दिलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 09:12 PM IST

बूट फेकून मारणाऱ्या खासदाराचं तिकीट कापलं

गोरखपूर, 15 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर अजून सहा टप्प्यांचं मतदान बाकी आहे. भाजपने निवडणुकीसाठीची आपली 21 वी उमेदवार यादी जाहीर केली. यामध्ये एका खासदारावर उमेदवारी न देण्याची कारवाई झाली आहे.

उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरमध्ये भाजपने प्रवीण निषाद यांना उमेदवारी दिली आहे. प्रवीण निषाद यांनी समाजवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. या मतदारसंघातले खासदार शरद त्रिपाठी यांना त्यांच्या बूटकांडाबदद्ल पक्षाने जोरदार दणका दिला आहे.

मुद्द्यावरून बुटांवर

गेल्या महिन्यात शरद त्रिपाठी हे संतकबीरनगरमधल्या एका बैठकीत भाग घेणार होते. याच बैठकीत भाजपचे आमदार राकेश बघेल यांच्यासह संतकबीरनगरचे जिल्हाधिकारी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधले एक मंत्री आशुतोष टंडन हेही सहभागी होणार होते. भर बैठकीत शरद त्रिपाठी आणि राकेश बघेल यांच्यात मारामारी सुरू झाली.

या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात शरद त्रिपाठी आपल्या पायातला बूट काढून राकेश बघेल यांना मारताना दिसत होते. राकेश बघेल यांनीही शरद त्रिपाठी यांच्या कानशिलात लगावून दिली. हे भांडण सोडवण्यासाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर आमदार राकेश बघेल यांनी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर निदर्शनं केली.

Loading...

रवींद्र गायकवाड यांच्यावर कारवाई

या घटनेमुळेच शरद त्रिपाठी यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. त्यांच्या जागी प्रवीण निषाद यांना संधी देण्यात आली आहे.याआधी, शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरही पक्षाने उमेदवारी न देण्याची कारवाई केली होती. खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती.

उत्तर प्रदेशमधल्या एकूण 80 जागांसाठी एप्रिल आणि मे महिन्यात मतदान होतं आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या या मतदानानंतर 23 मे ला या निवडणुकीचा निकाल येईल.

===================================================================================================================================================================

VIDEO : दोघांचं भांडणं तिसऱ्याचा राडा, टोल नाक्यावर तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: BJP
First Published: Apr 15, 2019 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...