नवी दिल्ली 6 जानेवारी : लोकसभा निवडणुकांना आता फक्त 5 महिने शिल्लक आहेत. मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केलीय. याच तयारीचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 20 डिसेंबर ते 03 जानेवारी असे 13 दिवस भाजपच्या सर्व खासदारांची भेट घेऊन चर्चा केली.
या बैठकीनंतर भाजपन काही निर्णय घेण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सध्याच्या खासदारांपैकी 25 टक्के खासदारांना पुन्हा तिकिटं न देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर 70 वर्षांच्या वरच्या नेत्यांनाही तिकिटं नाकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुरली मनोहर जोशींसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट होऊ शकते.
भाजपने आपल्या प्रत्येक खासदाराचं रिपोर्ट कार्ड तयार केलं आहे. खासदाराची लोकसभेतली कामगिरी, मतदार संघातला वावर, लोकांशी असलेला संपर्क, सोशल मीडियावरची प्रतिमा, प्रत्यक्षातलं काम अशा सगळ्या गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे.
2014 मध्ये मोदी लाटेत अनेक उमेदवार केवळ करिष्म्यावर निवडूण आले होते. नंतर त्यांनी प्रभावीपणे कामही केलं नाही. त्यामुळे भाजप त्यांचा पुनर्विचार करू शकते. 2019 ची लढाई ही अटीतटीची होण्याची चिन्हं असल्याने भाजपने प्रत्येक उमेदवाराची निवड अतिशय काळीपूर्वक करण्याचं ठरवलं आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेची युती झाली किंवा नाही तरी भाजपने सर्व 48 मतदारसंघासाठी उमेदवार निवडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी खासगी संस्थेकडून सर्व्हेही करून घेण्यात आला आहे. एक एक जागा ही महत्त्वाची असल्याने भाजप कुठलीही जोखीम घ्यायला तयार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णायक अधिकार अमित शहा यांनी दिले असून राज्यातली सर्व मदार ही देवेंद्र फडणवीसांवर अवलंबून असल्याचं बोललं जातंय.
UNCUT VIDEO : राज ठाकरे यांनी सांगितली 'एका लग्नाची पहिली गोष्ट'