नवी दिल्ली, 9 जून : मध्य प्रदेशातील भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एका रुग्णायात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ज्योतिरादित्य यांच्यासोबत त्यांच्या आईलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळतंय. दोघांनाही ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांची सोमवारी संध्याकाळी तब्येत बिघडल्यानंतर उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले होते. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आता त्यांना अॅडमिट करून घेण्यात आलं आहे. त्यानंतर आज सकाळपासून त्यांची विविध प्रकारची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याबाबत आऊटलूकने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, याआधी तब्येत अचानक बिघडल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचीही तब्येत रविवारपासून बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे केजरीवाल यांची आज कोरोना चाचणी झाली. अद्याप याबाबतचा अहवाल आलेला नाही.
हेही वाचा -
दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्यानंतर रविवारपासून त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. डॉक्टरांनी एक दिवस थांबण्यास सांगितलं असल्याने केजरीवाल यांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे एकीकडे दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असल्याने नवं आव्हान निर्माण झालं आहे.
संपादन - अक्षय शितोळे