'ते शब्द टाळायला पाहिजे होते', राज्यपालांच्या वक्तव्यावर अमित शहादेखील नाराज?

'ते शब्द टाळायला पाहिजे होते', राज्यपालांच्या वक्तव्यावर अमित शहादेखील नाराज?

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या वादग्रस्त पत्राबाबत भाष्य केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वादग्रस्त पत्र लिहिलं होतं. मंदिरं खुली करण्याची मागणी करणारं पत्र लिहिताना राज्यपालांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याची चर्चा झाली. याबाबत विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली असतानाच आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्राबाबत भाष्य केलं आहे.

'महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात? असं राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं. याकडे तुमचा पक्ष कसं बघत आहे?' असा प्रश्न 'न्यूज18'चे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी अमित शहा यांना विचारला. यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, 'राज्यपालांनी काही शब्द टाळले असते तर बरं झालं असतं.'

'मी ते पत्र वाचलं. त्यांनी एक संदर्भ देताना पत्रात तसा उल्लेख केला. मात्र ते टाळायला हवं होतं,' असं राज्यपालांच्या पत्राबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले.

राज्यपालांचे ते वादग्रस्त शब्द कोणते?

मंदिरे खुली करण्याबाबत राज्य सरकार उशीर करत आहे, याबाबत नाराजी व्यक्त करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट 'तुम्ही आता अचानक सेक्युलर झाला आहात की काय?' असा मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

उद्धव ठाकरेंनीही केला होता पलटवार

'महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राचा खरपूस समाचार घेतला होता.

Published by: Akshay Shitole
First published: October 17, 2020, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading