नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रबळ स्थान असलेल्या जाट क्षेत्रात नाराजी वाढत आहे. ही नाराजी दूर करण्याकरता आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील जाट बहूल क्षेत्रात वाढलेली केंद्र सरकारबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीत बैठकींचे सत्र सुरू झालं आहे.
जवळपास 100 दिवसांहून अधिक काळ राजधानी दिल्लीच्या सीमा भागांमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. हा संपूर्ण प्रदेश भारतीय जनता पक्षाचा मोठा पाठीराखा मानला जातो. केंद्रात सत्तेचे बहुमत मिळविण्याकरता या राज्यांतून मोठी रसद भारतीय जनता पक्षाला मिळत असते. मात्र शेतकरी नेते राकेश टीकेत यांच्या भावनात्मक आवाहनानंतर संपूर्ण जाट बहूल क्षेत्रात शेतकरी महापंचायती सुरू झाल्या आहेत.
यामुळे भारतीय जनता पक्षाचा पाठीराखा असलेला हा प्रदेश भाजपच्या मतपेटीच्या राजकारणातून दूर तर जाणार नाही ना, अशी चिंता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना लागली आहे. त्यामुळेच गेल्या आठवडाभरापासून विविध बैठकीचे सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची एक बैठक घेतली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात जाट बहूल क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांची बैठक आयोजित केली होती.
हेही वाचा - शेतकरी आंदोनाचा भाजपला मोठा झटका! नगरपालिका निवडणुकांत कॉंग्रेसची आघाडी, भाजपला धक्का
या बैठकीमध्ये शेती कायदे कसे लाभकारी आहे यासंदर्भात एक पुस्तिका तयार करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सर्व जबाबदारी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देण्यात आली आहे. यासंदर्भात माजी मंत्री संजीव बाली आनंद यांच्या निवासस्थानी देखील आज एक महत्वाची बैठक झाली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून निर्माण होत असलेल्या नाराजीला दूर करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची धार कशी कमी करता येईल यासाठी देखील भारतीय जनता पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.