22 मे : अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत देताच भाजपने वेळ न दवडता त्यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रजनीकांत यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याचे आमंत्रणच दिले आहे. 'राजकारणात येण्याचा विचार करत असाल, तर भाजपचा नक्की विचार करा,' असं आमंत्रणच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे.
'रजनीकांत यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्यासाठी पक्षात योग्य संधी आहे. रजनीकांत यांचे राजकारणात स्वागत आहे. त्यांनी भाजपचा विचार करावा, ही माझी विनंती आहे. त्यांना पक्षात चांगले स्थान मिळेल,' असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएनएन न्यूज 18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे.
'हा महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल. याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार माझ्याकडे नाहीत. पक्षाचे अध्यक्ष आणि संसदीय समिती याबद्दल निर्णय घेईल,' असं नितीन गडकरी यांनी पुढे स्पष्टं केलं आहे.
गेल्या आठवड्यात रजनीकांत यांनी राजकारण आणि व्यवस्थेविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर लगेचच भाजपने त्यांना पक्षात प्रवेश करण्याचे अप्रत्यक्ष आमंत्रण दिलं आहे. आता रजनीकांत यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याचे संकेत दिल्याने ते स्वत:चा पक्ष स्थापन करणार की एखाद्या पक्षात प्रवेश करणार, याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा