इंदूर, 6 एप्रिल : लोकसभा अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, असं स्वतः जाहीर करूनसुद्धा भाजपला इंदूरचा प्रश्न अजून सोडवता आलेला नाही. इंदूरमधून अद्याप उमेदवार का जाहीर केलेला नाही, असा सवाल करत सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी जाहीरपणे आपलं मांडलं.
यासंदर्भात पक्षात काही अनिश्चितता किंवा संकोच असेल तर ते दूर व्हायला हवं, म्हणून मी घोषणा करीत आहे', असं सांगत ताईंनी कालच आपल्या भावना कळवल्या, तरीही भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मध्य प्रदेशातल्या इंदूर मतदारसंघाचा उल्लेख नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यानंतर मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनाही भाजप उमेदवारी देणार नाही आणि त्यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार, अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. या निवडणुकीत वयोवृद्ध नेत्यांना उमेदवारी न देण्याचं भाजपचं धोरण असल्याने इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजनांना पुन्हा संधी देणार नाही, अशी सूत्रांची माहिती होती. तरीही अद्याप इंदूरच्या जागेसाठी भाजपने उमेदवार जाहीर न केल्याने संभ्रम कायम आहे. सुमित्रा महाजन यांनी स्वतःच पत्र लिहून आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीही भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.
काय म्हटलंय पत्रात?
'अद्याप पक्षाने इंदूरमधून उमेदवार जाहीर का केला नाही?' असा प्रश्न विचारतच त्यांनी या पत्राची सुरुवात केली आहे. 'यासंदर्भात पक्षात काही अनिश्चितता किंवा असामंजस्य असेल तर ते दूर व्हायला हवं, म्हणून मी घोषणा करीत आहे', असं महाजन यांनी म्हटलं आहे. 'इंदूरच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं. भाजपच्या सहकाऱ्यांनी नेहमीच मदत केली, सहकार्य केलं. त्यांची मी आभारी आहे, असं सांगून त्यांनी लवकरात लवकर इंदूरमधून उमेदवार जाहीर करावा. म्हणजे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काम करण्याची दिशा मिळेल.'
सुमित्रा महाजन यांचं वय ७६ वर्षं आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यानंतर महाजन यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होतीच. पण महाजन स्वतः याविषयी काही बोलत नव्हत्या. सुमित्रा महाजन यांच्या इंदूरच्या घरी नेहमीच कार्यकर्त्यांची वर्दळ असते. पण त्यांच्या उमेदवारीची शक्यता दिसत नसल्याने ही कार्यकर्त्यांची वर्दळही कमी झाली आहे. इंदूरच्या ताई अशी सुमित्रा महाजन यांची ओळख. पण ताईही वातावरणाचा अंदाज घेत असाव्यात. त्यामुळे त्यांनी या विषयावर इतके दिवस मौन बाळगणंच पसंत केलं होतं.
1989 पासून अजिंक्य होत्या ताई
इंदूरचा मतदारसंघ सुमित्रा महाजन यांच्या नावानेच ओळखला जायचा. 1989 पासून केवळ सुमित्रा महाजन या जागेवरून सलगपणे निवडून येत आहेत. खरं तर काही महिन्यांपूर्वी 'माझ्याविरुद्ध कुणालाही रिंगणात उतरवून दाखवाच', असं आव्हानही सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसला सुरुवातीला दिलं होतं. इंदूरच्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. पण आता त्यांच्या उमेदवारीवर निर्णय न झाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.
गेल्या महिन्यात न्यूज 18 ने जेव्हा त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता. तेव्हा उमेदवारीच्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला होता. भाजपने त्यांच्याऐवजी उमेदवाराचा शोधही सुरू केला आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी इंदूरच्या महापौर मालिनी गौड आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या नावांचा विचार होतोय, अशी सूत्रांची माहिती आहे.
सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसनेही भाजपला लक्ष्य केलं आहे. पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान होत नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. सुमित्रा महाजन यांच्या वयाच्या कारणासोबतच त्यांची निष्क्रियता हेही त्यांना उमेदवारी न देण्याचं कारण आहे, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.