नवी दिल्ली 17 नोव्हेंबर: बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडची कामगिरी NDAमध्ये सर्वात निराशाजनक राहिली. भाजपने सर्वात जास्त जागा पटकाविल्या. त्यामुळे भाजपचं वजन राज्यात वाढलं आहे. आधीच केलेल्या घोषणे प्रमाणे भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केलं. मुख्यमंत्रिपद दिलं तरी मंत्रिमंडळ खाते वाटपात भाजपचच वर्चस्व राहिल असं बोललं जात होतं. मात्र मंगळवारी झालेल्या खातेवाटपात नितीश कुमार यांनी आपल्याकडे आधीच असलेली सगळी महत्त्वाची खाती पुन्हा मिळवली आहे.
गृह आणि सामान्य प्रशासन ही महत्त्वाची खाती नितीश कुमार यांनी स्वत:कडे ठेवलेली आहेत. तर सुशील कुमार मोदी यांच्याकडे असलेलं अर्थ खातं हे भाजपचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांना देण्यात आलं आहे. आधीच्या सरकारमध्ये जी महत्त्वाची खाती जेडीयूकडे होती तेच सगळे विभाग आता जेडीयूकडेच राहणार आहेत.
जागा कमी मिळाल्या तरी आपले राजकीय महत्त्व कमी होणार नाही याची काळजी नितीश कुमार यांनी घेतली आहे.
Bihar portfolio allocation: Mukesh Sahni gets Animal Husbandry and Fishery, Mangal Pandey gets Health and Art and Culture and Bijendra Yadav gets Energy, Planning and Food and Consumer Affairs https://t.co/RWHyJxNpW7
— ANI (@ANI) November 17, 2020
शपथविधी कार्यक्रमात नितीश कुमार यांच्यानंतर भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतलीय होती. त्यानंतर जेडीयूच्या वतीने विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांनी शपथ घेतली. शीला कुमारी या पहिल्यांदाच मंत्री झाल्या आहेत.
हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या वतीने संतोष सुमन तर विकासशील इंसान पार्टीच्या वतीने मुकेश सहानी यांनी शपथ घेतली.
तर भाजपच्या वतीने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्याशिवाय मंगल पांडेय, अमरेंद्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजपच्या वाटाघाटीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातल्या जागा वाटपापासून ते सत्तेतल्या वाटणीपर्यंत सगळा अनुभव पाठीशी असल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीसांना ही मोठी जबाबदारी दिली होती.
या निवडणुकीत NDAला 125 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप 73, जेडीयू 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकास इंसाफ पार्टीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहेत. या पक्षांना त्यांना मिळालेल्या जागांप्रमाणे मंत्रिपदं देण्यात आली आहेत. RJD आणि काँग्रेससह महाआघाडीने या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.