पाटणा, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Assembly Election Result) हळूहळू समोर येत आहेत. आतापर्यंत स्पष्ट कल नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA ला मिळालेला दिसतो. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आधारावर भाजप आणि जदयू यांच्या NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असं भाजप नेतेही सांगू लागले आहेत. पण निवडणूक आयोगाने आत्ताच दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 25 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. अजूनही 4 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे निकाल फिरण्याचीही शक्यता आहे.
निकाल फिरू शकतो 2 कारणांमुळे
दुपारी 1 वाजेपर्यंत NDA ला 128 जागांवर आघाडी मिळालेली होती, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनला 100 च्या आसपास जागांवर आघाडी मिळवता आली. पण जवळपास 100 जागांवर दोन उमेदवारांच्या मतांमध्ये 2000 पेक्षाही कमी तफावत आहे. त्यामुळे निवडणूक निकालाचा कल कधीही फिरण्याची शक्यता आहे. दुसरं कारण अद्याप मतमोजणी अंतिम टप्प्यात आलेली नाही. निकाल पूर्ण व्हायला विलंब होऊ शकतो आणि पुढच्या टप्प्यांमध्ये कदाचित कल बदलूही शकतात.
काय आहे विलंबाचं कारण?
या वेळी कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि कमी गर्दी व्हावी यासाठी अधिक EVM मशीन लावण्यात आली होती. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागू शकतो. नेहमी 20-25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होते. या वेळी मशीन्स वाढल्यामुळे किमान 35 फेऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीचा अंतिम निकाल लागण्यासाठी रात्र होऊ शकते.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालची राजद-काँग्रेस आघाडी या दोन्हीमध्ये चुरशीची लढाई होत आहे. त्यामुळे निकाल सरळ साधा नाही. याशिवाय पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणीसुद्धा होत आहे. 10 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत टपालाद्वारे आलेल्या सर्व मतांची मोजणी केली जाणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.