Home /News /national /

बिहार निवडणुकीचे दोन्ही चेहरे ठरणार निष्प्रभ? सर्वाधिक स्ट्राइक रेट डाव्यांचा आणि भाजपचा; पाहा ताजे आकडे

बिहार निवडणुकीचे दोन्ही चेहरे ठरणार निष्प्रभ? सर्वाधिक स्ट्राइक रेट डाव्यांचा आणि भाजपचा; पाहा ताजे आकडे

Bihar Election Result : NDA ची आघाडी भाजपच्या जोरावर आणि महागठबंधमध्ये डाव्यांचा स्ट्राइक रेट सर्वाधिक. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार दोघांच्याही पक्षांची कामगिरी ठरू शकते सुमार. पाहा पक्षनिहाय ताजी आकडेवारी

    पाटणा, 10 नोव्हेंबर :  बिहार निवडणूक (Bihar Assembly Election 2020 Result) अनेक अर्थांनी राजकीय ट्रेंड सेटर ठरू शकते. आतापर्यंत स्पष्ट कल नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली NDA ला मिळालेला दिसतो. पण तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनसुद्धा फार मागे नाही. त्यामुळे लढाई कमालीची चुरशीची होत आहे. पण आघाडी आणि गठबंधनापलीकडे जाऊन प्रत्येक पक्षाची कामगिरी स्वतंत्रपणे जोखली तर मुख्यमंत्रिपदाचे दोन्ही दावेदार निष्प्रभ ठरू शकतील, अशी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता अधिक आहे. बिहार निवडणूक निकालांच्या आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांवरून सर्वात जास्त स्ट्राइक रेट डाव्यांनी (Left parties in Bihar) मारला आहे. त्याखालोखाल भाजपची कामगिरी (BJP seats in Bihar) चांगली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूची कामगिरी सर्वात सुमार झाली आहे आणि राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्या पक्षाची कामगिरीही फार चांगली झालेली नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा या दोन्ही पक्षांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. याउलट भाजप आणि डाव्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वाधिक चांगली कामगिरी डाव्यांनी केली आहे. या वेळी तीन डाव्या विचारसरणीचे पक्ष राजद, काँग्रेस यांच्या महागठबंधनमध्ये सामील झाले होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (CPIML) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) या तीन डाव्या पक्षांनी मिळून एकूण 29 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 19 जागांवर डाव्यांना आघाडी मिळाली आहे. 2015 च्या निवडणुकीत डाव्यांना सगळे मिळून फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे डाव्या आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राजद, काँग्रेस आणि डावे  या निवडणूकपूर्व आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेजस्वी यादवच होता. पण यादव यांच्या पक्षाची कामगिरी सुमार होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा राजदला 15 जागा  कमी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्याही 4 ते 5 जागा कमी होऊ शकतात. दुपारी 3 वाजेपर्यंत NDA च्या खात्यावर 124 आणि महागठबंधनकडे 108 जागांवर आघाडी होती. पक्षनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे दुसरीकडे संयुक्त जनता जलाची (JDU) कामगिरी सर्वात सुमार होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत नितीश कुमारांच्या पक्षाला तब्बल 20- 25 जागा कमी मिळण्याची शक्यता प्रारंभीच्या कलावरून दिसत आहे. दुसरीकडे JDU बरोबर असलेल्या भाजपला मात्र या निवडणुकीत फायदा झाल्याचं दिसतं. त्यांनी लढवलेल्या 110 जागांपैकी 70 हून अधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये 20 ने वाढ व्हायची शक्यता आहे. NDA नेसुद्धा JDU बरोबर निवडणूकपूर्व आघाडी जाहीर करत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढल्या. म्हणजे दोनही मुख्यमंत्रिपदाचे चेहरे चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. एक तर एक्झिट पोलचे निकाल आणि आतापर्यंतचा प्रत्यक्ष मतमोजणीचा कल याचा दूरान्वयानेही संबंध दिसलेला नाही. मतदानोत्तर चाचणी सपशेल आपटली आणि हे बिहारमध्येच दुसऱ्यांदा दिसलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Bihar Election, Nitish kumar

    पुढील बातम्या