आप हैं तो हम हैं, राहुल गांधींना कार्यकर्त्यांनी लिहिली 'रक्ता'ने पत्रं

आप हैं तो हम हैं, राहुल गांधींना कार्यकर्त्यांनी लिहिली 'रक्ता'ने पत्रं

'काँग्रेसला तुमची गरज आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पद सोडू नका. तुमच्याशीवाय काँग्रेसचा विचारच सहन होत नाही.'

  • Share this:

पाटना, 27 जून : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. मी माझा निर्णय बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर देशभरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पदावरच राहण्यासाठी आग्रह केलाय. बिहारची राजधानी पाटण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर राहुल गांधी यांना चक्क रक्ताने पत्र लिहीली आहेत. तुम्ही अध्यक्षपद सोडू नका, आप हैं तो हम हैं, अशी भावनिक सादही त्यांनी राहुल गांधी यांना घातलीय.

राहुल गांधी यांचं मन वळविण्यासाठी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते प्रयत्न करताहेत. मात्र राहुल गांधी ऐकण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे देशभरातले कार्यकर्ते विविध उपक्रम राबवून राहुल यांचं मन वळविण्याचा प्रयत्न करताहेत. पाटण्यातल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्ताने राहुल गांधी यांना आज पत्र लिहिलीत. काँग्रेसला तुमची गरज आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पद सोडू नका अशी साद त्यांनी घातलीय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही सर्व पत्रं बिहारचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांच्याकडे दिली आहेत. झा ती पत्रं राहुल गांधी यांच्याकडे पोहोचविणार आहेत.

काँग्रेस नेत्यांची बैठक

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्याच्याच मन: स्थितीत आहेत. त्यांनी राजीनामा देऊ नये अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे पण राहुल गांधी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक बोलावली होती. यामध्ये मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला पुन्हा धक्का? पुरस्कृत खासदार भाजपच्या वाटेवर

काँग्रेस नेते शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदी राहून काँग्रेसचं नेतृत्व सुरू ठेवण्याची विनंती केली. पराभवाची जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकून चालणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता माझा निर्णय झाला आहे आणि मी त्यावर ठाम आहे, असं राहुल गांधींनी त्यांना सांगितलं, अशी सूत्रांची माहिती आहे.

निवडणुकीबद्दल नेत्यांशी चर्चा

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आता विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी राहुल गांधींनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती.त्यामुळे राहुल गांधी अध्यक्षपदी कायम राहणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत,असंच दिसतं.

आधी नाकारला राजीनामा

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर 25 मे ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये राहुल गांधींनी राजीनामा देऊ केला होता. त्यावेळेस कार्यकारिणीने एकमताने त्यांचा राजीनामा नाकारला. राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहतील,असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितलं होतं.

मणिशंकर अय्यर यांचं विधान

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी नुकतंच राहुल गांधींबदद्ल एक विधान केलं होतं. राहुल गांधीच जर अध्यक्षपदी राहिले तर पक्षासाठी ते चांगलं आहे पण त्यांच्या इच्छेचाही आदर केला जाईल, असं ते म्हणाले होते. आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाबदद्ल काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading