पाटणा, 6 जानेवारी: भारताचा प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला 2014 नंतर एक प्रकारे गळतीच लागली आहे. आता बिहारमध्ये काँग्रेसला खिंडार पडण्याच्या बेतात आहे. एका कॉंग्रेस नेत्यानं याबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याने त्या राज्यात खळबळ उडाली आहे. पक्षातील 11 आमदार NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा या नेत्यानं केला आहे. आता बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेते भरतसिंह यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.
कॉंग्रेस नेते सिंह म्हणाले की, पक्षाचे 11 आमदार NDA मध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळं कॉंग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडणार असल्याचा दावा केला जात आहे. विधीमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित शर्मा हेही त्या 11 जणांमध्ये असल्याचं भरत सिंह यांनी सांगितलं आहे. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा हेही राजीनामा देणाऱ्यांमध्ये आहेत, असा दावा केला जात आहे.
कॉंग्रेस नेते भरतसिंग म्हणाले की, मदन मोहन झा आता अशोक चौधरीच्या यांच्या रस्त्यानं जात आहेत. कॉंग्रेसच्या 11 आमदारांनी पैसे देऊन तिकीट घेतलं आणि निवडणुका जिंकल्या असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच ते सर्व लवकरच NDA मध्ये सामील होतील असा दावाही त्यांनी केला आहे. भरत सिंह यांनी कॉंग्रेसला आरजेडीपासून काडीमोड घेण्याचा सल्लाही दिला आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकांमधील खराब कामगिरीनंतर बिहार कॉंग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर पक्षातील नेत्यांमधील परस्पर मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत.
शक्ती सिंह यांनीही दिला पदाचा राजीनामा
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहारचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांच्या राजीनाम्याला संमती दिली आहे. गोहिल यांना बिहार प्रभारी पदावरुन मुक्त करून त्यांच्या जागी भक्त चरण दास यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी शक्ती सिंह गोहिल यांनी पक्षाच्या नेतृत्वाला बिहार प्रभारीपदाची जबाबदारीतून मुक्त करावं आणि कमी जबाबदारीचं पद द्यावं, अशी विनंती केली होती. कॉंग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेचे खासदार शक्ती सिंह गोहिल यांची इच्छा मान्य करत त्यांची बिहार प्रभारी पदावरून मुक्तता केली जात आहे. तसेच त्यांच्या जागी आता ही जबाबदारी भक्त चरणदास यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.