लंडन रिटर्न पुष्पम प्रिया चौधरी यांचा भाजपवर EVM हॅक केल्याचा आरोप, दोन्ही जागांवर आहेत पिछाडीवर
ज्या निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत संपूर्ण देश आहे, त्या बिहार विधानसभा निवडणुकीबाबत आज उलगडा होणार आहे. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार काही व्हीव्हीआयपी चेहरे यामध्ये पिछाडीवर आहेत.
पाटणा, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची (Bihar Election Result 2020) मतमोजणी सुरू आहे. सकाळी 8 वाजल्यापासून विविध फेऱ्यांअंतर्गत निकाल उलगडण्यास सुरुवात झाली आहे. अनेक व्हीव्हीआयपी चेहरे यामध्ये पिछाडीवर आहेत. स्वत:ला मुख्यमंत्री पदाच्या दावेदार म्हणणाऱ्या 'द प्लूरल्स पार्टी' (Plurals Party) च्या प्रमुख पुष्पम प्रिया दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत. पुष्पम प्रिया चौधरी पटनामधील बांकीपूर आणि मधुबनीच्या बिस्फीमधून रिंगणात उतरल्या आहेत. पिछाडीनंतर पुष्पम प्रिया चौधरी यांनी एनडीएवर (NDA) ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप केला आहे. पुष्पम यांनी ट्वीट करून असा आरोप केला आहे.
पुष्पम प्रिया चौधरी यांनी भाजपवर असा आरोप केला आहे की, 'बुधनुसार पाहिले तर प्लूरल्सची मत चोरली आहेत!' त्यांनी आणखी एक ट्वीट करून असे म्हटले आहे की, 'भाजपने निवडणूक प्रभावित केली आहे. सर्व बुथवरील प्लूरल्स पार्टीची मत एनडीएकडे वळवली गेली आहेत.' पुष्पम यांच्या आधी काँग्रेसच्या एका नेत्याने देखील EVM हॅक केल्याचा आरोप केला आहे.
पुष्पम प्रिया यांनी बिहारमधील एका स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार सांगितलं होत. पुष्पम या सोशल मीडियावर देखील विशेष सक्रीय आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रचार केला होता. मात्र, दोन्ही मतदार संघात पुष्पम यांची पिछेहाट होताना दिसत आहे. बांकीपूरमध्ये त्यांच्या विरोधात बॉलीवूड अभिनेता आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजिव लव सिन्हा आणि भाजपकडून तीन वेळा आमदार राहिलेली नितीन नवीन आहेत.
मधुबनीमध्ये पुष्पम प्रिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याठिकाणी भाजपचे हरिभूषण ठाकूर हे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाचे डॉ. फैयाज अहमद हे दुसऱ्या क्रमाकावर आहेत. पुष्पम प्रिया या जेडीयू नेता विनोद चौधरी यांच्या कन्या आहेत. पुष्पम यांनी लंडन येथील प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्समधून पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे.