नवी दिल्ली 13 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar assembly election) महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. महाघाडीमध्ये आम्हाला जाण्याची इच्छा होती मात्र योग्य प्रतिनिधीत्व मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली आहे. बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांनी मिळून महाघाडी तयार केली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी तयार करून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे इतर राज्यांमध्येही काँग्रेसला राष्ट्रवादी साथ देणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र जागावाटपावरून गणित न जमल्याने राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे.
बिहारमध्ये शिवसेनेने 50 जागा लढविण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार असंही म्हटलं जात होतं. मात्र यासंदर्भात सेनेशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकते अशी शक्यता शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली होती.
एकेकाळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले बिहारचे तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी बिहारमध्ये काँग्रेसला साथ देण्यास फारशी उत्सुक नव्हती असंही बोललं जात आहे.
NCP isn't a part of Bihar Mahagathbandhan. We wanted to, but we weren't given space, so we'll contest alone. We've not had any discussion with Shiv Sena. Party workers demanded that we contest on our own, so we'll fight the election alone: Praful Patel, NCP #BiharElections2020 pic.twitter.com/yMi9XuSj9p
— ANI (@ANI) October 13, 2020
दुसरीकेडे NDAमध्ये फुट पडली आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. नीतिश कुमार यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही बाहर पडत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात आता तिरंगी लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसला तरी मतांचं विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनतादल युनायटेड आणि भाजपने समसमान जागांवर लढायचा निर्णय जाहीर केला आहे.