पूर्णिया 05 नोव्हेंबर: बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा आहे. यासाठीचा प्रचार गुरुवारी संपला. शेवटच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. ती वेळ साधत मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पूर्णियात शेवटची प्रचारसभा झाली. त्या प्रचारसभेत नितीश कुमार यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं. ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला’ असं म्हणत त्यांनी JDUला मतदान करण्याचं आवाहन केलं. हे आवाहन म्हणजे नितीश कुमार यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बिहारमध्ये जसं प्रचाराचा जोर वाढत गेला तसे वातावरण थोडं बदलल्याचं बोललं जातं आहे. तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभांना गर्दी वाढत असल्याने भाजप आणि जेडीयूच्या गोटात चिंताही निर्माण झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शेवटच्या दिवशी मतदारांना आपलसं करण्यासाठी नितीश कुमार यांनी हे भावनिक आवाहन केलं असावं असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला मतदान झालं तर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील. विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
This is my last election, says Bihar CM and JD(U) Chief Nitish Kumar during an election rally in Purnia#BiharElections2020 pic.twitter.com/vLSL4uQd4v
— ANI (@ANI) November 5, 2020
यावेळी मतदानासाठी एक तासची वेळ वाढविण्यात आली होती. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान झालं आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता आला. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होत आहे.