मुजफ्फरपुर 31 ऑक्टोबर: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election 2020) प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाचा एक टप्पाही पार पडलाय. या काळात प्रचारसभेत स्टेज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना शनिवारीही घडली आहे. मुजफ्फरपुर (Muzaffarpur) जिल्ह्यातल्या मीनापूर इथं जन अधिकार पार्टी (Jan Adhikar Party) चे अध्यक्ष पप्पू यादव (Pappu Yadav) यांची सभा होती. सभेत भाषण करत असतानाच अचानक स्टेज कोसळलं आणि यादव खाली पडले. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. त्यामुळे यादव यांचं भाषण जोरदार झालं असलं तरी लोकांना न भेटता हॉस्पिटलमधून थेट घरीच जावं लागलं.
वजनदार नेते असलेले पप्पू यादव हे पक्षाच्या स्थानिक उमेदवार बीना यादव यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेत भाषण करत होते. भाषण सुरू झाल्यावर काही मिनिटांमध्येच अचानक स्टेज कोसळला.
त्यामुळे यादव हेही खाली कोसळले. त्यांच्या डाव्या हाताला जास्त मार लागला आहे. त्यामुळे प्रथमोपचारानंतर त्यांना हेलिकॉप्टरने थेट पाटण्यात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या हाताला प्लॅस्टर केलं असून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
#WATCH: Stage collapses at Jan Adhikar Party leader Pappu Yadav's campaign rally in Muzaffarpur's Minapur Assembly Constituency.#BiharElections2020 pic.twitter.com/pZIfEINAm1
— ANI (@ANI) October 31, 2020
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील. दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.