पाटना 16 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता तापलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA निवडणूक लढवत असून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांनी महाआघाडी स्थापन केली आहे. आत्तापर्यंत NDAमध्येच असलेल्या लोक जनशक्ती पक्षाने विधानसभा निवडणुकांआधी वेगळी वाट धरली आहे. आपलं भाजपसोबत भांडण नाही. मात्र नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य नाही असं LJPचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी हनुमान असल्याचंही ते म्हणाले.
पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला भाजपची फूस असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे भाजपने त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटो वापरण्यास मनाई केली आहे. त्यावर बोलताना चिराग पासवान म्हणाले, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सर्वात जास्त आक्षेप आहे. पंतप्रधान मोदी हे माझ्या ह्रदयात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. गरज पडली तर मी छाती फाडून ते दाखवून देऊ शकतो असंही चिराग पासवान यांनी सांगितलं.
पक्षाचे संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने लोक जनशक्ती पक्षाला धक्का बसला आहे. आता विधानसभा निवडणुकीत चिराग यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. लोक जनशक्ती स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.
निवडणुकीनंतर आपला भाजपलाच पाठिंबा असेल असंही चिराग यांनी म्हटलं होतं. भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाचं सरकार राज्यात सत्तेवर येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
#WATCH I don't need to use PM Modi's photos for campaigning. He lives in my heart, I am his Hanuman. If needed, I'll tear open my chest and show it: LJP chief Chirag Paswan#BiharElections pic.twitter.com/KhVPG4w2J2
— ANI (@ANI) October 16, 2020
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील. दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi