नवी दिल्ली, 10 जुलै : दिल्लीला (Delhi) पडणारा अंमली पदार्थांचा (Drugs) विळखा वाढत चालला असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंतचे सर्वाधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं (Special Branch of Delhi Police) 300 किलोपेक्षाही (300kg) अधिक ड्रग्ज जप्त केले असून त्याची बाजारातील किंमत ही 2500 कोटींपेक्षाही (2500 Crore) अधिक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून दिल्लीत झालेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
असं उघडकीला आलं रॅकेट
दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या ड्रग्ज रॅकेट उघडकीला आणण्याच्या प्रक्रियेची इत्यंभूत माहिती दिली. भारतात वेगवेगळ्या देशांतून समुद्रमार्गे ड्रग्जची तस्करी होत असून त्यातील बहुतांश ड्रग्ज हे दिल्लीत येत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी 354 किलो अंमली पदार्थ जप्त केले. बाजारातील सर्वात महाग मिळणारं हे हेरॉईन असून ते अफगाणिस्तानवरून आणलं गेल्याचंही उघड झालं आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन पंजाबचे असून एक काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ड्रग्ज मध्यप्रदेशातील शिवपुरी या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी नेलं जाणार होतं, अशी माहिती आहे. त्यानंतर ते पंजाबमध्ये नेऊन त्याची विक्री करण्याचा डाव होता. मात्र पोलिसांनी हा डाव हाणून पाडला आहे.
वाचा - भेळीवरुन जुंपली! फेरीवाले आणि प्रवाशांमध्ये तुफान राडा; हाणामारीचा VIDEO व्हायरल
विदेशी नागरिकालाही अटक
दिल्लीत ड्रग्जच्या तस्करीचं प्रमाण वाढत चाललंय. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोहान्सबर्गला चाललेल्या एका नागरिकाला पोलिसांनी संशयावरून अटक केली. जाम्बियाचा रहिवासी असलेल्या हा नागरिक तस्कर असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. या नागरिकाच्या एक्सरेमधून पोटात ड्रग्जच्या कॅपसूल असल्याचं दिसून आलं. त्यानंतर शस्त्रक्रिया करून या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. एकूण 106 कॅप्सूलमध्ये 1052 किलो कोकेन पावडर लपवून ठेवल्याचं निष्पन्न झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi Police, Drugs