सर्वात मोठ्या रेल्वे दरोड्याचा खुलासा, नोटबंदीमुळे झाली ५ कोटी रुपयांची रद्दी

सर्वात मोठ्या रेल्वे दरोड्याचा खुलासा, नोटबंदीमुळे झाली ५ कोटी रुपयांची रद्दी

रेल्वेच्या छताला भगदाड पाडून दरोडेखोरांनी आरबीआय बॅकेचे ५ कोटी लुटले होते

  • Share this:

नासिर हुसैन,प्रतिनिधी

01 डिसेंबर : तामिळनाडूमध्ये दोन वर्षांपूर्वी एका रेल्वेवर चोरांनी मोठा धाडसी दरोडा टाकला होता. रिझर्व्ह बँकेच्या कोट्यवधी रुपये दरोडेखोरांनी लंपास केले होते. पण नोटबंदी लागू झाल्यामुळे दरोडेखोरांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. अचानक नोटबंदी लागू झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची रद्दी झाली. या प्रकरणाचा छडा नुकताच सीआयडीने लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 आॅगष्ट 2016 रोजी सेलम-चेन्नई एक्स्प्रेसवर चोरांनी दरोडा टाकला होता. रेल्वेच्या पॉर्सल डब्यामध्ये रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)चे तब्बल 345 कोटी रुपये होते. पैशांच्या सुरक्षेसाठी 18 सुरक्षारक्षक तैनात होते. पण अचानक मध्यरात्री रेल्वेच्या या डब्यातून 5 कोटींच्या 500 आणि 1000 च्या नोटा गायब झाल्यात.

चौकशीतून समोर आले की, रेल्वेच्या छताला भगदाड पाडून दरोडेखोरांनी ५ कोटी लुटले. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिसांनी केला. पण काही तपास न लागल्यामुळे या प्रकरणाचा तपास चेन्नई पोलिसांकडे गेला. परंतु, त्यांनाही या प्रकरणाचा छडा लावता आला नाही. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी ही सीआयडीकडे देण्यात आली. अनेक महिन्यांच्या तपासानंतर सीआयडीने देशातील सर्वात मोठ्या दरोड्याचा पर्दाफाश केला.

8 दिवस केली रेल्वेची रेकी

सीआयडीने १३ नोव्हेंबरला या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. आरोपी गुना, मध्यप्रदेश येथील राहणारा मोहर सिंह आणि त्याचे चार साथिदार हे नोव्हेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये आले होते. याच दरम्यान त्यांना सेलम-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये आरबीआयचे कोट्यवधी रुपये आणणार असल्याची खबर मिळाली. आरोपी मोहर सिंहसह त्याच्या साथिदारांनी जवळपास 8 दिवस सेलम-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये प्रवास केला. त्यांनी पूर्ण रेकी केली, रेल्वे कुठल्या स्टेशनवर थांबते, किती वाजता निघते याचा अभ्यास केला. त्यानुसार चिन्नासालेम आणि विरुधचलम रेल्वे स्टेशनदरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा कट रचला. या दोन्ही स्टेशनदरम्यान रेल्वे 45 मिनिटांचा प्रवास करते आणि त्यावेळी मध्यरात्रीचा काळोख असतो.

धावत्या रेल्वेत असा टाकला दरोडा

ज्या दिवशी दरोडेखोरांनी दरोडा टाकला त्या दिवशी मोहर सिंह आणि त्याचे सहकारी हे रेल्वेच्या छतावर बसून प्रवास करत होते. या रेल्वे ट्रॅकवर डिझेल इंजिनवर रेल्वे चालते त्यामुळे त्यांचं काम आणखी सोपं झालं होतं. त्यांनी रात्रीच बॅटरीच्या मदतीने रेल्वेचं छत कापलं आणि बोगीत प्रवेश केला. लाकडी बाॅक्स कापून त्यांनी पैशांची बंडलं अंतवस्त्रात लपवून छतावर बसलेल्या साथीदारांना दिली. पुढे रेल्वे ट्रॅकजवळ त्याचे साथिदार थांबलेले होते त्यांच्याकडे पैशाची बंडलं फेकून दिली. त्यानंतर दरोडेखोर रेल्वेच्या छतावरून उडी मारुन पसार झाले.

नासाची घेतली मदत

या प्रकरणाचा छडा लावणं पोलीस आणि सीआयडीसाठी मोठं जिकरीचं काम झालं होतं. अशीही चर्चा होती की, या प्रकरणाच्या तपासासाठी अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाची मदतही घेतली. त्यावरुन सीआयडीला कळाले की नेमकं कोणत्या ठिकाणी दरोडा टाकला. परंतु, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नासाकडून मदत घेतली असल्याचं खंडन केलं.

सीआयडीने हा संपूर्ण तपास एका मोबाईलमुळे लावला असं सांगितलं जात आहे. ज्या भागात दरोडा पडला त्या भागातील सर्व मोबाईल नेटवर्कवरुन त्या काळादरम्यानचे काॅल रेकॉर्ड तपासले गेले. सीआयडी हजारो नंबर तपासले. पण काही फोन काॅल हे संशयास्पद वाटले. त्या मोबाईल क्रमांकाचा आईडी तपासला असता ते मध्यप्रदेशचे असल्याचं कळालं. त्याआधाराचे पुढे तपासाची चक्र फिरली आणि एक एक करून पाच जणांना अटक करण्यात आली.

कोट्यवधी रुपये झाले रद्दी

दरोडेखोर मोहर सिंहने सांगितलं की, आम्ही दरोडा टाकला खरा पण एकदाच हे सगळे पैसे खर्च करणे कठीण काम होते. काही पैसे आम्ही खर्च केले. पण 8 नोव्हेंबरला नोटबंदीची घोषणा झाली त्यामुळे 500 आणि 1000 च्या नोटा कुठेही देता आल्या नाही त्यामुळे त्यांची रद्दी झाली.

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 09:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading