काँग्रेसचं 'डिझास्टर मॅनेजमेंट'; या दिग्गज नेत्यांना विधानसभा लढण्याचे आदेश!

काँग्रेसचं 'डिझास्टर मॅनेजमेंट'; या दिग्गज नेत्यांना विधानसभा लढण्याचे आदेश!

काँग्रेस श्रेष्ठींचा आदेश असला तरी राज्यातले नेते तो आदेश पाळतील का हाच खरा प्रश्न आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, प्रशांत लीला रामदास 17 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातलं वातावरण अनुकूल नाही हे लक्षात आल्याने कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी काँग्रेसने 'डिझास्टर मॅनेजमेंट'ला सुरुवात केलाय. यासाठी दिल्लीत एक खास योजना तयार केली जात असून त्यात राज्यातल्या 42 दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जे नेते कधीही विधानसभा निवडणूक लढले नाही अशा काही नेत्यांनाही विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं जाऊ शकतं. मात्र श्रेष्ठींचा आदेश काँग्रेसचे हे नेते पाळतील का हाच खरा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. अंतर्गत वाद, मतभेद, पक्षातून सोडून जात असलेले नेते, खंबीर नेतृत्वाचा अभाव यामुळे राज्यात पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे.

राणा जगजितसिंह यांच्यामुळे उस्मानाबादमध्ये भाजप भोपळा फोडणार का?

या विधानसभा निवडणुकीत फार काही हाती पडणार नाही याचा अंदाज आल्याने 'तन-मन-धना'ने किती नेते लढतील अशी शंका व्यक्त केली जातेय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांच्यासह सर्व अनेक ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अशा दिल्या सूचना दिल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

गेली पाच वर्ष सत्तेबाहेर राहिल्याने काँग्रेसचे आर्थिक स्रोत आटले आहेत. जे काही शिल्लक होते ते सत्ताधारी भाजपने बंद करून टाकले. त्यामुळे अनेक नेत्यांची कुचंबना होतेय. त्यातच राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षात एक पोकळी निर्माण झालीय. सोनिया गांधींकडे अध्यक्षपद आलं तरी त्या पूर्वीसारख्या सक्रिय राहिलेल्या नाहीत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला खूप वेळ लागतोय.

धक्कादायक: ट्युशनला येणाऱ्या 7वीच्या विद्यार्थ्यानेच केली शिक्षिकेची हत्या

असं सगळं वातावरण असताना भाजपने अतिशय आक्रमकपणे प्रचाराला सुरुवात केलीय. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये पूर्वीसारखा उत्साह नाही. त्यामुळे अनेक नेते निवडणूक लढविण्याची शक्यता नाही असंही बोललं जातंय. दरम्यान, काँग्रेसच्या छाननी समितीची बुधवारी 18 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजता बैठक होणार आहे. 15 गुरूद्वारा रकाब गंज मार्गावरच्या वॉर रूम मध्ये ही बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

येत्या 2 ऑक्टोंबरला राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पदयात्रा काढावी अशी विनंती महाराष्ट्र काँग्रेसने केली आहे. असाच प्रस्ताव तामिळनाडू आणि बिहारने देखील दिला असून राहुल गांधी काय निर्णय घेतात याकडे सगळ्या नेत्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या