लावापोरा, 30 डिसेंबर: श्रीनगर येथील लावापोरा भागात कालपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. मंगळवारी सायंकाळी या ऑपरेशनची सुरूवात झाली होती. आज बुधवारी हे ऑपरेशन थांबवलं आहे. या दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना जवानांना अनेक अडचणी आल्या. या कारवाईत भारतीय जवानांची कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मंगळवारी संध्याकाळी अंधारामुळे ही कारवाई थांबण्यात आली होती, त्यानंतर बुधवारी सकाळी ही कारवाई पुन्हा सुरू केली गेली. प्रोटोकॉलनुसार मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री रात्री याठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी पळून जावू नये म्हणून त्या संबंधित ठिकाणी लाइट्स लावण्यात आल्या होत्या. जेणेकरून पूर्ण रात्र त्यांच्यावर लक्ष देता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी होकेरा या प्रसिद्ध वेटलँडशेजारील लावापोरा भागात शिरले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांनी काही भागात कडक बंदोबस्त केला आणि तिथे दहशतवाद्यांचा शोध घेतला. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र अचानक भारतीय जवानांवर गोळीबार सुरू झाला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानांनीही गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि या चकमकीला सुरुवात झाली.
श्रीनगरमध्ये मोठी कारवाई, सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान... कारवाई दरम्यानचा थरारक VIDEO समोर#JammuKashmir #Srinagar pic.twitter.com/EYc3Pzm1Q4
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) December 30, 2020
यावर्षी अतिरेक्यांनी श्रीनगरच्या आसपास सुरक्षा दलांवर कमीतकमी पाच गोळीबार करुन पळ काढला होता. अशाप्रकारच्या जवळपास 10 चकमकी श्रीनगरमध्ये आतापर्यंत झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला याच भागात गस्त घालणाऱ्या सैन्याच्या एका तुकडीवर हल्ला करण्यात आला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी सुरक्षा दलाकडून केलेल्या कारवाईत आतापर्यंत 200 हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. देशभरात आठ महिन्यांचा कोरोना लॉकडाऊन असताना एवढ्या दहशतवादी कारवाया भारतीय सैन्यानी हाणून पाडल्या आहेत.