भोपाळ, 21 मे : कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या (Corona in India) पार्श्वभूमीवर देशभरात विविध राज्यांमध्ये कडक नियमावली लागू केली असून पोलीस नागरिकांकडून त्याचं पालन करवून घेत आहेत. काही ठिकाणी या नियमावलीचं पालन करवून घेताना पोलीस आणि नागरिकांमध्ये वादाचे तर कधी गमतीचे प्रसंगही घडत आहेत. काही ठिकाणी नागरिक पोलिसांवर मनमानी कारभाराचा आरोप करत आहेत. असाच एक प्रसंग घडला आहे. नागरिक यावरून पोलिसांवर टीका करत असून त्यांच्या कामाची खिल्लीही उडवत आहेत.
कोरोना नियमावली अंतर्गत मास्क नीट न घातल्याबद्दल एका दीड वर्षाच्या मुलाला शंभर रुपयांचा दंड पोलिसांनी आकारला. भोपाळमध्ये कुटुंबीयांसोबत कारमधून प्रवास करणाऱ्या या मुलाच्या एका कानाला मास्क लटकत होता. चेकिंग पॉईंटवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या लहान मुलाच्या नावानं शंभर रुपयांची पावती फाडली. या पावतीवर मुलाचं नाव गौरव जैन आणि वडिलांचं नाव पुरू जैन असं लिहिलं. मात्र त्यावर मुलाचं वय न लिहिता वडिलांचं वय लिहिलं. हे कुटुंब स्थानिक परिसरातच राहण्यास आहे. या कारमध्ये आणखी एक 6 वर्षीय मुलगाही होता. त्यानं मास्क लावलेला होता. तसंच गाडीतल्या सर्व लोकांनी आणि चालकानंही मास्क लावला होता.
लोक उडवताहेत पोलिसांची खिल्ली
दीड वर्षाच्या मुलावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या आणि पावतीवर वडिलांचं वय लिहिणाऱ्या पोलिसांची लोक खिल्ली उडवत आहेत. एका बाजूला पोलीस अधीक्षक राजीव कुमार मिश्रा पोलीस कर्मचाऱ्यांना वारंवार नागरिकांसोबतचे आपले वर्तन बदलण्याचं आणि फक्त नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देत आहेत. तरीही पोलीस कर्मचारी वारंवार मनमानी करताना दिसत आहेत, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
हे वाचा - WHO च्या विधानाने खळबळ! कोरोना मृत्यूंची खरी आकडेवारी आहे फार मोठी
मागील काही दिवसात अनेक वेळा या भागात पोलिसांची मनमानी पाहायला मिळाली आहे. इथल्या पोलिसांनी भल्लनपुरा चेकिंग पॉईंटवर एका तरुणाला जोर (डिप्स) मारण्याची शिक्षा दिली होती. तर, केंट चौकात मजुरी करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाच्या दुचाकीमधली हवा सोडली होती. कोरोनाचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी मात्र पोलिसांनी उगीचच एखाद्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं लोकांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.