भोपाळ, 7 फेब्रुवारी: भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी रात्री एका मुलीने व्हिडीओ कॉल केला. त्या व्हिडीओ कॉलमध्ये संबंधित तरुणी ही न्यूड दिसत होती. त्यानंतर प्रज्ञा यांना दोन अज्ञात मोबाईल नंबरवरुन अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यात आले. या प्रकरणी साध्वी यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्या अज्ञात फोन नंबरविरोधात एफआयआर दाखल करत तपास सुरु केला आहे.
याप्रकरणी खासदार प्रज्ञा सिंह यांनी शहरातील टीटी नगर पोलीस ठाण्यात रात्री दोन वाजता तक्रार केली होती. पोलिसांनी तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखत प्रज्ञा यांना ज्या मोबाईल नंबरद्वारे मेसेज आले होते त्या नंबरवर एफआयआर दाखल केला. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
या प्रकरणावर तपास कुठपर्यंत आला याविषयी टीटी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चेन सिंह रघुवंशी यांनी माहिती दिली. "पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. तक्रारीनुसार खासदारांना आधी अश्लील फोटो पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर सेलचीदेखील मदत घेतली जात आहे. आरोपींना लवकरच पकडलं जाईल", अशी माहिती त्यांनी दिली.
(Propose Day विषयी हे माहित आहे का? कसं करावं प्रपोज? काय द्यावं गिफ्ट? करा क्लिक)
मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एका मुलीचा व्हिडीओ कॉल आला होता. या मुलीने कॉल उचलल्यानंतर अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रज्ञा यांनी तातडीने फोन डिस्कनेक्ट केला. हा फोन मोबाईल नंबर 6371608664 या नंबरवरुन आला होता. त्यानंतर लगेच 8280774239 या मोबाईल नंबरवरुन त्याच मुलीचा रेकॉर्डिंग व्हिडीओ पाठविण्यात आला. यावेळी संबंधित तरुणीने प्रज्ञा साध्वी यांच्यासोबतचा तो व्हिडीओ कॉल सोशल मीडिआवर शेअर करण्याची धमकी दिली. जर आपण सांगितलेलं प्रज्ञा यांनी केलं नाही तर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु, अशाप्रकारे त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं.
संबंधित प्रकरण हे विचित्र असल्याची जाणीव झाल्यानंतर प्रज्ञा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी कलम 354, 507 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रज्ञा ठाकूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना 5 फेब्रुवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News, India, Mp