Home /News /national /

धार्मिक ऐक्याची प्रचिती! मुस्लीम व्यक्तीने हनुमान मंदिरासाठी दान केली कोट्यवधींची जमीन

धार्मिक ऐक्याची प्रचिती! मुस्लीम व्यक्तीने हनुमान मंदिरासाठी दान केली कोट्यवधींची जमीन

कर्नाटकच्या बेंगळुरू (Bangalore) येथे सामाजिक भावनेची घटना घडल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी राहणाऱ्या एका मुसलमान व्यक्तीने मोठं हनुमान मंदिर बांधण्यासाठी स्वेच्छेने आपली जमीन दान केली आहे.

    बेंगळुरू, 09 डिसेंबर:  कर्नाटकच्या बेंगळुरू (Bangalore) याठिकाणी धार्मिक ऐक्य आणि सामाजिक भावनेची घटना घडल्याचे पाहायला मिळालं. याठिकाणी राहणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीने मोठं हनुमान मंदिर बांधण्यासाठी स्वेच्छेने आपली जमीन दान केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जागेची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या व्यक्तीच्या असं लक्षात आलं की, लहानशा जागेत असणाऱ्या या हनुमान मंदिरात पूजा करताना भाविकांना त्रास होत आहे. त्याठिकाणी पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे जमीन दान देण्याचा निर्णय घेतला. एचएमजी बाशा असं या जमीन दान देणाऱ्या मुस्लीम व्यक्तीचं नाव आहे.  65 वर्षीय बाशा कार्गोचा व्यवसाय करतात. ते बंगळुरुच्या काडूगोडी या भागात राहतात. बेंगळुरूच्या मायलापुरा भागात त्याच्याकडे जवळपास 3 एकर एवढी जमीन आहे. या जागेचे मूल्य आज कोट्यवधी रुपये आहे. त्यांच्या या जमिनीजवळच एक प्राचीन हनुमान मंदिर आहे, भाविक मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येतात. (हे वाचा-केंद्राकडून शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव, आंदोलक भूमिकेवर ठाम; कोंडी फुटणार?) लक्षात आला हनुमान भक्तांना पूजेदरम्यान होणारा त्रास मंदिर छोटे असल्याने भाविकांना त्रास होतो. मंदिर समितीने यापूर्वीही मंदिर विस्ताराचे नियोजन केले होते. पण त्याच्याकडे जमीन नव्हती. मंदिरा शेजारीच बाशा यांची जमिन होती, पण बाशा त्यांच्याशी बोलण्यास मंदिर समिती टाळाटाळ करत होती. काही दिवसांपूर्वी बाशा यांनी पाहिलं की, मंदिरात भक्त अगदी लहान जागेत पूजा करत आहेत.यामुळे या भाविकांना मोठा त्रास होत असेल असं त्यांना जाणवले. अशा परिस्थितीत त्यांनी स्वत: पुढाकार घेत आपली जमीन दान देण्याचा निर्णय घेतला. (हे वाचा-Maratha Reservation : अंतरिम स्थगितीवर निर्णय नाही, अंतिम सुनावणी 25 जानेवारीला!) मीडिया अहवालाच्या मते ही जमिन ओल्ड मद्रास मार्गावर मुख्य रस्त्यालगतच आहे. त्यांच्या या मदतीचं कौतुक सर्वच स्तरातून केलं जात आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी मंदिर परिसरात पोस्टर देखील लावण्यात आले आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या