बंगळुरू, 10 ऑक्टोबर : एक विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारचं दार उघडून बसेपर्यंत 45 वर्षांच्या महिलेसोबत मोठी दुर्घटना घडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला आहे. कारचं दार उघडून ही महिला गाडीत बसेपर्यंत कार मागे गेली आणि कारचं दार आणि झाड यांच्यामध्ये धडकून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
अंगावर शहारे आणणारी ही घटना रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'द न्यूज मिनट'ने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ बंगळुरू इथला असल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी झाड आणि कारचं दार यामध्ये चिरडून एका महिलेचा मृत्यू झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिकांनी या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. या महिलेला उपचारासाठी कोलंबिया एशिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता ही महिला कारचं दार उघडून गाडीत बसत असताना अचानक गाडी मागे गेली आणि कारच्या दरवाज्यासोबत महिला मागे ओढली गेली. त्याचवेळी मागे असलेलं झाड आणि कारचा दरवाजा यामध्ये ही महिला चिरडली आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं रक्तस्राव जास्त झाला होता. आजूबाजूनं जाणाऱ्या लोकांनी तातडीनं पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि महिलेला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.