बेगुसराय (बिहार), 16 मे : बिहारमधल्या या एका जागेकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. मोदींनी तुकडे तुकडे गँग म्हणून हिणवलेल्या कन्हैया कुमार यांनी बेगुसरायहून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या जागेचं महत्त्व वाढलं.
भाजपनेसुद्धा कन्हैय्याविरुद्ध हिंदुत्ववादाचा चेहरा म्हणून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना उमेदवारी दिली. महागठबंधनकडून राष्ट्रीय जनता दलाच्या तनवीर हसन यांना तिकिट मिळालं. गेल्या निवडणुकीत भाजपचे भोला सिंह इथून विजयी झाले होते, तर दुसऱ्या जागेवर तनवीर हसन होते. यंदा बेगुसरायची लढत तिहेरी असल्यानं आणखी चुरशीची होते आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI) तिकिटावर कन्हैय्या कुमार कडवी लढत द्यायला मैदानात उतरले आहेत. JNU मधल्या विद्यार्थी संघटनेचे नेते असताना भारतविरोधी घोषणा दिल्याच्या मुद्द्यावरून कन्हैय्या कुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी असहिष्णुतेचा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलून धरला होता. आता हेच कन्हैय्या कुमार निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असणारे गिरिराज सिंह त्यांच्या विरोधात आहेत.
खरं तर गिरिराज यांना बेगुसरायहून उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. ते गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुका नवादामधून लढले होते. या वेळी त्यांच्या मर्जीविरोधात पक्षाने त्यांचा मतदारसंघ बदलला, म्हणून सुरुवातीला ते नाराज होते. पण पक्षश्रेष्ठींची भेट झाल्यानंतर ते जोमाने प्रचाराला लागलेले दिसले. बेगुसरायमध्ये 2004 पासून NDA चा उमेदवार निवडून येत आहे. CPI ने एकेकाळी इथली पकड घट्ट करत पण गेल्या काही वर्षांत गडाला खिंडार पडलं आहे. आता ही जागा भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी CPI ला कन्हैय्या कुमारसारखं चर्चेतलं नाव मिळाल्याने पक्षाच्या आशा वाढल्या आहेत.
तर दुसरीकडे राजदचे तन्वीर हसन यांच्यामुळे कन्हैय्या कुमारला मिळणारी मतं विभागली जातील का अशी शंकाही विश्लेषक बोलून दाखवत आहेत.
जातीचं राजकारण ठरणार मोठं?
बेगुसरायमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लीम मतदार आहेत. त्यांची मतं कन्हैय्या कुमारला मिळणार की तन्वीर यांना यावर इथला निकाल अवलंबून असेल.
जातीनिहाय मतदार
भूमिहार 380000
मुस्लीम 284000
यादव 225000
कुर्मी 140000
कुशवाहा 125000
राजपूत 75000
कायस्थ 50000
ब्राह्मण 80000
पासवान 150000
निषाद 7000
मुसहर 7000
अन्य 100000
-----------------------
एकूण मतदार 9,53007
पुरुष मतदार 1038983
महिला मतदार 9,13962
अन्य 62
-------------------------
या मतदारसंघात भूमिहारांची संख्या लक्षणीय आहे. भूमिहारांची मतं गिरिराज सिंह आणि कन्हैय्या कुमार यांच्यामध्ये विभागली जातील, असं बोललं जात आहे. इथल्या जातरचनेमुळे आणि ध्रुवीकरणामुळे हा बेगुसरायचा तिरंगी सामना चुरशीचा होत आहे.