06 एप्रिल : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची विमानप्रवास बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. शिवसेनेच्या दबावानंतर अखेर भाजपला नमती भूमिका घ्यावी लागली.
उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी पुणे-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला होता. बिझनेस क्लासचं तिकीट असताना इकोनाॅमी क्लासमध्ये बसवण्यावरुन झालेल्या वादात रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला सँडलने मारहाण केली होती. या घटनेनंतर एअर इंडियाने रवींद्र गायकवाडांवर विमान प्रवास बंदी घातली होती.
आज गायकवाड यांनी लोकसभेत आपली बाजू मांडली. माझ्यावर लावलेला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा. माझ्यावरची विमान प्रवास बंदीही हटवावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांच्या मागणीनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये. रवींद्र गायकवाड प्रकरण निस्तरले नाही तर 10 ताखेच्या एनडीएच्या बैठकीत आम्ही जाणार नाही अशी भूमिका सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. भरात भर म्हणजे सेनेचे मंत्री अनंत गीते यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजूंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर सेनेच्या आक्रमकतेपुढे भाजपला नरमाईची भूमिका घ्यावी लागली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा