नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : हिमाचल प्रदेशातील मनाली (रोहतांग खिंड) आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेहला जोडणाऱ्या अटल बोगद्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 3 ऑक्टोबरला, शनिवारी करण्यात येणार आहे. या नव्या बोगद्यामुळे रस्त्यानी प्रवासाचं 46 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून, प्रवासाचा चार ते पाच तासांचा वेळ वाचणार आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हा बोगदा सर्वप्रकारच्या वातावरणात प्रवासाला खुला राहू शकेल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. हिमाचल आणि लडाख दोन्हीकडे हिवाळ्यात बर्फवृष्टी होते त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टिनी हा बोगदा उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान लाहौल स्पितीमधी सिसू आणि सोलांग व्हॅलीतील सार्वजनिक कार्यक्रमांतही उपस्थित राहणर असल्याचंही त्यांच्या कार्यालयानं कळवलं आहे.
‘अटल बोगदा हा 9.02 किलोमीटरचा असून, जगातील महामार्गांवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. हा बोगदा मनालीला लाहौल स्पितीशी जोडणार असून, वर्षभर हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असेल. हा बोगदा होण्यापूर्वी दरवर्षी सहा महिने होण्याऱ्या जबरदस्त हिमवर्षावामुळे लाहौल स्पिती खोऱ्याचा इतर जगाशी असलेला संपर्क तुटायचा. समुद्र सपाटीपासून 3000 मीटर (10,000 फूट) हिमालयातील पिर पंजाल पर्वतरांगांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पद्धतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे,’ पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
या बोगद्याचं दक्षिणेकडचं तोंड मनालीपासून 25 किलोमीटर अंतरावर 3060 मीटर उंचीवर आहे तर उत्तरेकडचं तोंड 3071 मीटर उंचीवर असलेल्या लाहौल स्पितीतील सिसूजवळच्या तेलिंग या गावाजवळ आहे. हा घोड्याच्या नालेच्या आकाराचा सिंगल ट्युब, दुहेरी वाहतुकीचा बोगदा असून त्यात 8 मीटरचा रोड वे आहे. त्याचबरोबर या बोगद्याचा क्लिअरन्स 5.525 मीटरचा आहे. दररोज 3000 कार आणि 1500 ट्रक सर्वांधिक 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानी प्रवास करू शकतील अशी या अटल बोगद्याची क्षमता आहे. रोहतांग खिंडीच्या खालून बोगदा काढण्याचा निर्णय माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने 3 जून 2000 ला घेतला होता. त्यानंतर 26 मे 2002 ला बोगद्याच्या दक्षिणेकडील तोंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची पायाभरणी झाली होती.