भोपाळ, 11 मे: भाजपमधील बंडखोर नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे टीकाकार असलेल्या यशवंत सिन्हा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या सिन्हा यांनी गुजरात दंगलीनंतरचा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गुजरात दंगलीनंतर अडवाणी यांच्यामुळे मोदींची खुर्ची वाचल्याचे विधान सिन्हा यांनी केले आहे.
भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना यशवंत सिन्हा यांनी आतापर्यंत कधी समोर न आलेली एक माहिती दिली आहे. 2002मध्ये गुजरात दंगलीनंतर पंतप्रधान वाजपेयी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. पण वाजपेयी यांच्या या निर्णयावर पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते लालकृष्ण अडवाणी नाराज होते. वाजपेयींच्या या निर्णयावर अडवाणी यांची नाराजी इतकी तीव्र होती की त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती. अडवाणींच्या या धमकीनंतर मोदींची हकालपट्टी करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला होता.
गुजरातमधील दंगलीनंतर वाजपेयींना हे पक्क ठरवले होते की, मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. गोव्यातील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत अटलजींनी हे निश्चित केले होते की जर मोदींनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदावरून हटवले जाईल. पक्षात यावर चर्चा देखील झाल्याचे सिन्हा यांनी सांगितले. जितक मला माहित आहे त्यानुसार, अडवाणी यांनी या गोष्टीला विरोध केला होता. अडवाणी यांचा मोदींना हटवण्याच्या निर्णयाला इतका विरोध होता की जर मोदींना हटवले तर मी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देईन, अशी धमकीच त्यांनी दिल्याचे सिन्हा म्हणाले.
अडवाणी यांच्या विरोधामुळेच मोदी मुख्यमंत्रीपदावर राहिल्याचे सिन्हा यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमात त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली. सध्याची भाजप अटलजी आणि अडवाणी यांच्या काळातील नाही. आज देशात असहिष्णुता वाढली आहे. गेल्या काही वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने पाकिस्तानचा मुद्दा आणला होता ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे सिन्हा म्हणाले.
याशिवाय त्यांनी मोदी सरकारचे जम्मू-काश्मीर धोरणावर टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था बिघडली आणि बेरोजगारी देखील वाढल्याचा आरोप सिन्हा यांनी केला.
VIDEO: हेल्मेट न घालणाऱ्या मुंबई पोलिसाची दादागिरी, प्रश्न विचारणाऱ्या तरुणालाच झापलं