मुंबई, 25 डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे भारताच्या राजकारणात तेजस्वी नक्षत्रप्रमाणे असलेलं नाव. सत्तेत असताना अटलजींनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. भारताचं भविष्य बदलण्यात अटलजींचा सिंहाचा वाटा आहे. 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 डिसेंबर हा दिवस अटलजींच्या सन्मानार्थ गुड गवर्नेन्स डे साजरा करण्याची घोषणा केली होती. अटलजींनी सत्तेत असताना 10 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. ज्यामुळे भारताच्या विकासाला आणि भविष्याला एक वेगळं वळण मिळालं. हे निर्णय कोणते होते आणि त्याचा फायदा कसा झाला जाणून घ्या.
1. पोखरणमध्ये अणुचाचणी करणं हा अटलजींनी घेतलेला सर्वात मोठा धाडसी निर्णय. सत्तेवर येऊन काही दिवस झालेले असतानाच सर्व जगाचा दबाव झुगारून वाजपेयींनी 11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरणमध्ये पाच अणुचाचण्या केल्या. भारत अणुशक्ती संपन्न राष्ट्र झालं. अनेक बड्या देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले मात्र वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
2.1999 मध्ये पाकिस्तानने कारगील वर अतिक्रमण करत ताबा मिळवला. परवेज मुशर्रफ तेव्हा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते. पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनी तेव्हा आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन न करण्याचा निर्णय घेत लष्कराला पूर्ण स्वातंत्र दिलं आणि भारतानं कारगीलवर पुन्हा ताबा मिळवला.
3. ग्रामीण रोजगाराला प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी खास योजना सुरू केली. ग्रामीण विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी दिला.
4. देशभर सर्व शिक्षा अभियानाची सुरवात करून प्राथमिक शाळेत मुलांचं शिक्षण सुटू नये यासाठी केंद्राने खास मोहीम राबवली
हे वाचा-राज्यावर नव्या Coronavirus चं सावट! UK हून 45 नागरिक थेट कल्याणमध्ये
5.वाजपेयी पंतप्रधान असतानाच पहिल्यांदा पूर्वोत्तरातल्या राज्यांसाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती.
6.सुवर्ण चतुर्भुज योजना ही वाजपेयींची महत्वाकांक्षी योजना. या योजनेनुसार देशाचे चारही कोपरे हायवेने जोडण्यात आले. दिल्ली,कोलकता,चेन्नई आणि मुंबई या मोठ्या शहरांना हायवेने जोडण्यात आलं.
7.भारतातली सर्व खेडी डिजिटल कनेक्टिव्हीने जोडली जावीत यासाठी त्यांनी खास योजना राबवली.
8.वाजपेयींच्याच काळात भारताचे अमेरिका आणि इस्त्रायलशी संबंध सुधारले. त्यांच्या परराष्ट्र धोरणाने जगभर भारताचा प्रभाव निर्माण केला.
9. 19 फेब्रुवारी 1999 ला पंतप्रधान वाजपेयी बसने पंजाब सीमेवरून लाहोरला गेले. 'सदा-ए-सरहद' असं त्या बसचं नामकरणं करण्यात आलं. वाजपेयी बसने लाहोरला गेले आणि नवाज शरीफ यांची भेट घेतली. भारत-पाकिस्तानच्या संबंधातला हा नवा अध्याय होता.
10. जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर 1977 मध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात हिंदीतून भाषण केलं. असं भाषण करणारे ते पहिलेच भारतीय नेते होते. त्यांच्या या कृतीचं सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केलं.