उज्जैन, 24 फेब्रुवारी : माणसाचं उतार वय होतं तेव्हा त्याचं शरीर थकू लागतं आणि त्यामुळेच त्याचं मनही कच खाऊ लागतं. पण काही ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे आपल्या ध्येयाने आणि चिकाटीने कठीण गोष्टी साध्य करतात. उज्जैनमधील अशाच एक निवृत्त प्राध्यापिका शशिकला रावळ यांनी वयाच्या 80 व्या वर्षी संस्कृत या विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी चिकाटीने आपलं ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार केला, तर ते ध्येय गाठू शकतात हे उदाहरणच शशिकला यांनी सर्वांसमोर ठेवलं आहे. मध्य प्रदेश सरकारच्या शिक्षण खात्यात उज्जैनमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी करून शशिकला निवृत्त झाल्या.
उज्जैनमध्येच राहणाऱ्या शशिकला यांनी 2009 ते 2011 दरम्यान खगोलशास्रात एमए केलं. संस्कृत भाषेतील वराहमिहिरांची बृहद संहिता या खगोलशास्राशी संबंधित विषयात त्यांनी पीएचडी केली. त्यांची पीएचडी 2019 मध्ये पूर्ण झाली.
प्रा. शशिकला रावळ यांना ‘सोशल लाइफ अॅज सीन थ्रु द मिरर ऑफ बृहद संहिता’ या विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी देण्यात आली. महर्षी पाणिनी विद्यापीठाच्या माजी कुलगुरु मिथिला प्रसाद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते प्रा. रावळ यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. आनंदीबेन यांना शशिकला यांच्या चिकाटीचं आश्चर्य वाटलं असून त्यांनी त्यांचं कौतुकही केलं आहे.
विश्रांतीच्या वयातही त्यांनी पीएचडी का केली असं विचारल्यावर प्रा. शशिकला रावळ म्हणाल्या, ‘मला पहिल्यापासून खगोलशास्रात रस होता त्यामुळेच मी विक्रम विद्यापीठाने सुरू केलेल्या खगोलशास्रातील एमए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मी वराहमिहिरांची बृहद संहिता वाचली होती. त्यामुळे मी त्यात अधिक अभ्यास करायचं ठरवलं. खगोलशास्राच्या अभ्यासानंतर माझ्या विचारांना वेगळी दिशा मिळाली', असं त्यांनी सांगितलं.
त्याशिवाय, 'जसं एखाद्या ठिकाणी जाताना आपण नकाशांचा वापर करतो, तसंच जीवनात खगोलशास्राचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. या मार्गदर्शनाच्या मदतीने आपण जीवनातील संकटांचा सामना करू शकतो. खगोलशास्रामुळे आपल्या आयुष्यात येणारी संकटं आपल्याला आधीच लक्षात येऊ शकतात आणि आपण आपलं जीवन अधिक सुकर करू शकतो. मला माझ्या ज्ञानाचा उपयोग जनसामान्यांसाठी करायचा आहे.’ असंही त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.