EXIT POLLS : गोंधळ वाढला; लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप की काँग्रेस?

EXIT POLLS : गोंधळ वाढला; लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप की काँग्रेस?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांची नांदी समजली जात आहे. या सेमीफायनलमध्ये मोदी लाट निष्प्रभ ठरणार का, राहुल गांधी यांची जादू चालणार का याबरोबरच छोट्या पक्षांच्या भूमिकांची कसोटी लागणार आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजाचं त्या दृष्टीने केलेलं विश्लेषण...

  • Share this:

मुंबई,७ डिसेंबर  : विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या एक्झिट पोल्सचे आकडे बाहेर आली आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांची नांदी समजली जात आहे. या सेमीफायनलमध्ये मोदी लाट निष्प्रभ ठरणार का, राहुल गांधी यांची जादू चालणार का याबरोबरच छोट्या पक्षांच्या भूमिकांची कसोटी लागणार आहे. एक्झिट पोल्सचे अंदाज थेट निकालापेक्षा वेगळे जरी लागले तरी यातून ही लाट, जादू आणि आवाका निश्चित होणार आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता संपलं. त्यानंतर काही वेळातच एक्झिट पोल्सचे निकाल यायला सुरुवात झाली.

एक्झिट पोल्सनी वर्तवलेले निकालाचे अंदाज आणि प्रत्यक्षातले निकाल यात साम्य असतं का? किती वेळा हे निकाल खरे ठरतात आणि किती वेळा सपशेल चुकतात? याचं विश्लेषण दर वेळी होत असलं, तरी एक्झिट पोल्समधून मतदारांचा कल दिसून येतो. एक्झिट पोल्सचे प्राथमिक अंदाज पाहता मोदी लाटेचा प्रभाव कमी झाल्याचं निश्चित दिसतंय.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश हा भाजपचा बळकट किल्ला मानला जात होता. तिथलं राज्य सरकार स्थिर होतं आणि एक्झिट पोल्सचा अंदाज खरा ठरला तर तो भाजपसाठी धोक्याची घंटा ठरेल.  एबीपी लोकनीतीनं केलेल्या सर्वेक्षणात तर भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय. भाजपच्या खात्यावर त्यांनी फक्त 94 जागांची शक्यता असल्याचं म्हटलंय. काँग्रेसला 126 तर अन्य 10 असं गणित एबीपीनं मांडलंय.

बाकीच्या एक्झिट पोल्सनीसुद्धा राजस्थानात भाजपचा टक्का कमी झाल्याचं म्हटलंय. सर्वाधिक 126 जागा मिळतील असा कयास टाईम्स नाऊनं वर्तवलाय.

2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी सर्व एक्झिट पोल्सचे निकाल सपशेल चुकले होते आणि भाजपला दणदणीत विजय मिळाला होता. कुणीही अपेक्षा केली नव्हती असे आकडे भाजपच्या पदरात पडले होते. आता तीच जादू उलटी पडू शकते. एका एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपचा सपशेल पराभव मध्य प्रदेशात होऊ शकतो.

राजस्थान

राजस्थानमध्ये विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी केलेले एक्झिट पोलचे कल हाती आले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वसुधंरा राजे यांच्या सरकारला हादरा बसण्याची चिन्ह आहे. राजस्थान भाजपच्या हातातून निसटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेस जोरदार मुसंडी मारून एक हाती सत्ता राखणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

मोदी लाट विधानसभेत तरी पुरती निष्प्रभ ठरल्याचं इथे दिसतं. या राज्यात सलग सत्ता कुणालाच न मिळण्याचा इतिहास आहे. त्यातून वसुंधरा राजे यांच्याबद्दल मतदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं बोललं जातं. तेच एक्झिट पोल्समधून दिसतंय.  'मोदी तुझसे बैर नाही, वसुंधरा तेरी खैर नाही' ही घोषणा निवडणुकीच्या वेळी गाजली होती. पण विधानसभा ही लोकसभेची सेमीफायनल ठरली तर लोकसभेत मोदींचंसुद्धा खरं नाही, असं दिसतं.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्येही भाजपला सरकार मिळवणं सोपं दिसत नाही. मोदी लाट याही राज्यात फार नसल्याचं एक्झिट पोल्सच्या अंदाजावरून कळतंय.

रिपब्लिक टीव्हीच्या अंदाजानुसार

बीजेपी- 40-48

काँग्रेस- 37-43

तर टाइम्स नाउनं केलेल्या सर्व्हेनुसार,

बीजेपी- 46

काँग्रेस- 35

भाजप- काँग्रेसमध्ये अटीतटीची स्पर्धा या राज्यात होण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसचं वजन जास्त असणार असं एक्झिट पोल्स सांगतात.

तेलंगण

तेलंगणात काँग्रेसपेक्षाही स्थानिक पक्षच प्रबळ असल्याचं दिसतं. तेलंगण राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव सरकार टिकवणार असा अंदाज आहे.

टाईम्स नाऊ आणि सीएनक्सच्या पोलनुसार,

तेलंगणा राष्ट्र समिती – 66

काँग्रेस – 37

भाजप – 7

इतर - 9

इंडिया टुडेच्या पोलमध्ये याहून जास्त जागा TRS ला देण्यात आल्यात. ओवैसींच्या MIMनं मात्र या वेळी भाजपपेक्षा जास्त जागांची अपेक्षा ठेवली आहे. ओवैसींचा पक्ष या दक्षिणेकडच्या राज्यात चांगले हातपाय पसरणार अशी शक्यता यातून दिसतेय. लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी हा मोठा धोका ठरू शकतो.

मिझोराम

मिझोराम नॅशनल फ्रंट ही निवडणूक गाजवणा असं दिसतंय. काँग्रेसला मिझोराममध्ये बॅकफूटला जावं लागणार. या राज्यात खातं उघडायची भाजपची शक्यता मात्र कमीच आहे. एकूण ४० जागांच्या या राज्यात मिझो नॅशनल फ्रंटला 18 तर काँग्रेसला 16 जागा मिळणार असं एक एक्झिट पोल सांगतो.

रिपब्लिक आणि सी-वोटर यांच्या एक्झिट पोलनुसार, मिझो नॅशनल फ्रंट (MNF) हा पक्ष सत्तेचा जवळ जाताना दिसत आहे. तर सध्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. कुणालाही पूर्ण बहुमत मिळत नसल्याने अपक्षांना महत्त्व येणार आहे.

मिझो नॅशनल फ्रंट (MNF) - 18

काँग्रेस – 16

इतर – 6

 

दरम्यान, विधानसभा निवडणूक झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांतील एक्झिट पोल समोर येत आहेत. या एक्झिट पोल्समधून प्रत्येकजण वेगवेगळे दावे करत असतो.

निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल लागण्याआधी अनेकांचं या एक्झिट पोल्सकडे लक्ष लागलेलं असतं. प्रत्यक्षात यातील अनेक पोल चुकीचे ठरतात. तर काही एक्झिट पोल निकालाच्या जवळ जाणारे असतात. हे पोल नेमके कसे केले जातात, हे जाणून घेऊयात.

एक्झिट पोल हे नेहमी मतदानाच्या दिवशीच केले जातात. मतदान केल्यानंतर जेव्हा मतदार पोलिंग बूथमधून बाहेर पडतात, तेव्हाच एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांकडून मतदारांना त्यांचं मत विचारलं जातं.

मतदारांनी सांगितलेल्या माहिती एक्झिट पोल करणाऱ्या संस्था एकत्रित करतात. या संस्था प्रत्येक मतदाराचंच मत विचारात घेत नाहीत. तर त्यांनी एक सॅम्पल साईज ठरवलेली असते.

वेगवेगळ्या परिसरातील, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी बोलून ही माहिती जमा केली जाते. त्याआधारेच निवडणूक निकालांबाबत अंदाज बांधला जातो.

VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 08:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading