गुवाहाटी 24 फेब्रुवारी : आसाममध्ये विषारी दारु घेतल्याने 140 जणांचा मत्यू झाला तर 300 जणांची गंभीर आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. त्यानंतर अनेकांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. रविवारी मृतांची संख्या वाढली आहे. ही संख्या अजुनही वाढेल अशी भीती राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी दिली आहे.
सालमारा चहाच्या मळातल्या मजुरांना वेतन मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक दुकानातून ही दारु घेतली होती. 10 ते 20 रुपयांना मिळणारी ही दारु स्वस्त असल्याने अनेक मजुरांनी ती घेतली. त्यानंतर त्याच रात्री चार महिलांचा मृत्यू झाला.
त्यानंतर ही संख्या वाढत गेली. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांमध्ये दारुच्या दुकानाचा मालक आणि त्याच्या आईचाही समावेश आहे. सरकारने आत्तापर्यंत 12 लोकांना अटक केलीय. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर उपचार सुरू असणाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी केली आहे.
आयुक्त दर्जाचा अधिकारी या घटनेची चौकशी करणार असून एका महिन्यात त्याचा अहवाल देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 2011 मध्ये घडलेल्या एका घटनेत 172 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही ही सर्वात मोठी घटना आहे.