Assam : तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले तरुण गोगोई यांचं निधन; कोरोनावर मात करूनही लढाई अयशस्वी!

Assam : तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले तरुण गोगोई यांचं निधन; कोरोनावर मात करूनही लढाई अयशस्वी!

तरुण गोगोई (Tarun Gogoi) हे सलग 15 वर्षं सत्तेत राहिलेले आणि तीन वेळा मुख्यमंत्रिपद उपभोगलेले काँग्रेसचे बडे नेते होते. Covid-19 ची लागण झाल्यावर प्लाझमा थेरपीनंतर कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना गेल्या महिन्यात डिस्चार्जही मिळाला होता.

  • Share this:

गुवाहाटी, 23 नोव्हेंबर : तीन वेळा आसामच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेले काँग्रेस नेते तरुण गोगोई (Tarun Gogoai) यांची आयुष्यासाठी लढाई अखेर संपली. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी गोगोईंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. गोगोई यांची प्रकृती गेल्या महिन्याभरात खालावली होती.  त्यांना कोरोना व्हायरसची (Covid-19) लागण झाली होती. या विषाणूविरुद्धची लढाई जिंकून त्यांना 25 ऑक्टोबरला रुग्णालयातून सोडण्यातही आलं होतं. पण त्यानंतर महिन्याभरात त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला.

85 वर्षांचे तरुण गोगोई यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट्स त्यांचा मुलगा आणि खासदार गौरव गोगोई यांनी दिले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाने गाठलं होतं. त्यांच्यावर गुवाहाटी रुग्णालयात बरेच दिवस उपचार सुरू होते. प्लाझमा थेरपीसुद्धा त्यांच्यावर केली गेली. त्याला प्रतिसाद मिळाला आणि कोरोनावर त्यांनी मात केली. गेल्या महिन्यात त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. पण या आठवड्यात त्यांना पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तरुण गोगोई हे ईशान्य भारतातले काँग्रेसचे मोठे नेते होते. ते सहा वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते. सलग तीन वेळा मुख्यमंत्री होऊन 15 वर्षं सत्तेत असणारे ते या राज्याचे एकमेव नेते ठरले. सुरुवातीला आसामच्या जोरहाट मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असत. त्यानंतर कालिबोरमधून ते निवडून आले. सध्या कालियाबोर मतदारसंघातून त्यांचा मुलगा गौरव गोगोई खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 23, 2020, 6:08 PM IST

ताज्या बातम्या