राष्ट्रपतींची जात काढल्याने वाद पेटला, अशोक गेहलोत यांचं आक्षेपार्ह विधान

राष्ट्रपतींची जात काढल्याने वाद पेटला, अशोक गेहलोत यांचं आक्षेपार्ह विधान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या जातीवरून केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधल्या एका सभेमध्ये भाषण करताना हे वक्तव्य केलं.

  • Share this:

जयपूर, 17 एप्रिल : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या जातीवरून केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधल्या एका सभेमध्ये भाषण करताना हे वक्तव्य केलं.

'गुजरातच्या निवडणुका जवळ आल्या होत्या त्यावेळी भाजपला गुजरातमध्ये यश येणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे जातीय समीकरणं जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यात आलं आणि लालकृष्ण अडवाणींना हे पद मिळालं नाही', असं अशोक गेहलोत म्हणाले आणि वाद पेटला.

अशोक गेहलोत यांनी निवडणुकीच्या राजकारणात थेट राष्ट्रपतींनाच ओढल्यामळे या लोकसभा निवडणुकीत हा वाद चांगलाच स्फोटक बनला आहे. अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी हे वक्तव्य करून गंभीर वादाला तोंड फोडलं आहे.

राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले. आता लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी गेहलोत यांनी तयारी चालवली आहे.

याआधी, काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुस्लीम समुदायासमोर केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. बिहारमधल्या कटिहारमध्ये सिद्धू यांनी मुस्लीम मतदारांना, मोदींना मत न देण्याचं आवाहन केलं होतं.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण अडवाणींना राष्ट्रपती केलं गेलं नाही. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीतही लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात होतं.

लोकसभेचं मतदान सुरू होण्याच्या काही दिवस आधी लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेला एक ब्लॉगही गाजला होता. जे आपल्या विरोधात आहेत त्यांना आपण राष्ट्रद्रोही म्हणू शकत नाही, अशी टिप्पणी अडवाणींनी केली होती. यावरून लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले मतभेद समोर आले.त्यातच आता अशोक गेहलोत यांनी हे वक्तव्य करून भाजपमधल्या या वादाच्या आगीत तेल ओतलं आहे, अशी चर्चा आहे.

====================================================================================================================================================================

VIDEO: ...म्हणून राष्ट्रवादीला कायमचं गाडा: रामदास आठवले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या