नवी दिल्ली, 29 मे : 'मला मंत्रिपद नको', असं म्हणत भाजप नेते अरूण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अरूण जेटली यांची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर जेटली यांनी नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिलं आहे.
'तुमच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. यावेळी मला खूप काही शिकता आलं. आताही तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाने पुन्हा एकदा बहुमत मिळवलं आहे. पण प्रकृतीच्या कारणास्तव मी नव्या सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी घेऊ इच्छित नाही,' असं अरूण जेटली यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलं. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. तर, NDAचं संख्याबळ हे 350च्या घरात गेलं. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार? मित्र पक्षांना किती जागा असणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषता जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला 2014मध्ये अवघं एक मंत्रिपद मिळालं होतं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक पद शिवसेनेला देण्यात येणार होतं. पण, मातोश्रीवरून गेलेल्या फोननंतर अनिल देसाई यांना विमानतळावरून माघारी परतावं लागलं होतं.
शिवसेनेनं वेळोवेळी आपली नाराजी उघड केली होती. राज्यात देखील दोन्ही पक्षांमध्ये सतत खटके उडत होते. पण, भाजपनं बदलत्या राजकीय स्थितीचा अंदाज घेत शिवसेनेशी जुळवून घेतलं. पण, NDA-2मध्ये शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार हे पाहावं लागणार आहे.
महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल